आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Give Clean Chit To Narendra Modi Over Gujrat Riot

शरद पवारांचीही गुजरात दंगलीसंदर्भात नरेंद्र मोदींना दिली क्लीन चिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली असल्याने आता गुजरात दंगलीबद्दल भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही मोदींना क्लीन चिट दिली. एकदा कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.
याचा अर्थ राष्‍ट्रवादी व भाजपमध्ये सलगीचे वारे सुरू आहे, असा नाही. कारण, मोदींचे विचार राष्‍ट्रवादीला कधीच मान्य नाहीत, असे सांगण्यासही पवार विसरले नाहीत. या आठवड्यात राष्‍ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत मोदींवर भाष्य टाळले होते. त्यांच्या वक्तव्यावर पवारांनीही शिक्कामोर्तब केले. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौ-यात रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जागावाटपाचा निर्णय 10 दिवसांत : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा निर्णय येत्या 10 दिवसांत होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेमध्ये या प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
टोलबाबत सर्वसमावेशक धोरण हवे : जगभरात रस्त्यांसाठी टोल आकारला जातो. राज्याच्या प्रगतीसाठी टोल रद्द करणे योग्य ठरणार नाही; तो जाचक नसावा यासाठी सर्वसमावेशक नवे धोरण आखावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ‘अतिरेकीवृत्तीच्या नेतृत्वाने मुंबईतील कापड गिरण्या संपवल्या. आता त्याच प्रवृत्ती राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया असलेली साखर कारखानदारी संपवू पाहत आहेत. हातात आसूड घेवून कोणतेही आंदोलन यशस्वी होत नाही. अशा लोकांचा लोकशाहीवर विश्वास नसतो.’
मुंडेंबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘मी शेतक-यांचा शत्रू असल्याची टीका गोपीनाथ मुंडे करतात. मात्र, शेतक-यांच्या हिताची धोरणे राबवल्यानेच भारत गहू, साखर, तांदुळ निर्यातीत अव्वल स्थानी गेला. शेतक-यांना 60 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याने उत्पादनाचे सर्व विक्रम मोडित निघाले. मुंडेंनी आधी याचा अभ्यास करावा.’