आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांध पक्षांच्या झुंडशाहीचे आव्हान मोडून काढणार - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘देशापुढे आज झुंडशाही आणि धर्मांध पक्षाच्या ताकदीचे मोठे आव्हान आहे. ते आव्हान मोडून काढत महायुतीचा पराभव करणे हेच काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ध्येय आहे. खोटा इतिहास सांगणार्‍यांना, संवेदनाशून्य नेतृत्वाला पंतप्रधान म्हणून निवडल्यास देशाचे भले कसे होईल?’ अशा शब्दात केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी व भाजपवर टीका केली.

सातार्‍यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आघाडीची प्रचारसभा घेण्यात आली, या वेळी ते बोलत होते. मोदींचे नाव न घेता पवार म्हणाले की, भाजपने पंतप्रधानपदासाठी ज्यांचे नाव पुढे केले आहे ते खोटे बोलणारे नेतृत्व आहे. सेवाग्राम येथे चलेजावची चळवळ सुरू झाल्याचे ते सांगतात. प्रत्यक्षात ही चळवळ मुंबईतून सुरू झाल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना इतिहासच मुळी ठाऊक नाही.

मोदींबाबत न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचा आम्ही आदरच करतो. परंतु गोध्रा हत्याकांडात एका खासदाराला मारले जाते, त्यांच्या कुटुंबियांचे साधे सांत्वनही तेथील मुख्यमंत्र्यांनी केले नाही, हे असंवेदनशीलता आहे. केवळ राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना विरोध हाच एककलमी कार्यक्रमावर त्यांचा प्रचार सुरू आहे. खरे तर निवडून आलेले खासदार पंतप्रधान निवडतात, मात्र भाजपने आधीच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केला. हा प्रकार म्हणजे सांप्रदायिकतेला आणि विघटनाला बळ देणारा असल्याचे पवार म्हणाले.