आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shetkari Sanghtana Adjourned Its Sugarcane Agitation For 24 November

शेतकरी संघटनेचे ऊसदर आंदोलन 24 पर्यंत स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या, सी. रंगराजन अहवाल लागू करा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या घरावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला. त्यामुळे बाजार समितीच्या मैदानात शेट्टींनी जाहीर सभा घेत आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.
जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतच शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये गुरूवारपासूनच चोख बंदोबस्त तैनात करून जमावबंदी लागू करण्यात आली होती. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह सुमारे पाऊण लाख शेतकरी कराडमध्ये जमा झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रस्त्यातच अडवल्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळापासून बाजार समितीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेट्टी यांनी शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या राज्य सरकार व साखर कारखान्यांच्या भूमिकेवर टीका केली.
...अन्यथा तीव्र आंदोलन
जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी आणि पोलिस अधीक्षक प्रसन्ना यांचीही भेट घेऊन शेट्टी यांनी निवेदन दिले. ‘मुख्यमंत्री ऊसदर प्रश्नावर लवकरच निर्णय घेणार असून आपण आंदोलन थांबवावे’, अशी विनंती दोघांनीही शेट्टी यांना केली. त्यामुळे सरकारला मुदत देण्याची भूमिका घेत 24 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णयही शेट्टी यांनी जाहीर केला. मात्र 24 तारखेपर्यंत सरकारने निर्णय जाहीर न केल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.