सांगली - जिल्ह्यात भाजपला छुपी साथ देणारे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात
भाजपबरोबरच शिवसेनेनेही माघार घेतली आहे. काँग्रेसने मात्र उमेदवार उभा करून केविलवाणे आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या पराभवाचे शिवधनुष्य खांद्यावर घेतलेल्या जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवू अशा वल्गना शेट्टी यांनी केल्या होत्या. त्यामुळे या वेळी जयंत पाटील यांच्यापुढे स्वाभिमानी संघटना तगडे आव्हान उभा करेल, असे वाटत होते. इकडे भाजपला मात्र जयंत पाटील यांची छुपी साथ राहिली आहे. त्यामुळे भाजपने जागा वाटपातच ही जागा स्वाभिमानीसाठी सोडून पाटील यांची वाट मोकळी करून दिली होती. राजू शेट्टी यांना मात्र येथे उमेदवार मिळाला नाही, म्हणून त्यांनी शिवसेनेच्या कुंपणावर बसलेल्या नाना महाडिक यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांनीही बुधवारी उमेदवारी अर्जच मागे घेतला.
शिवसेनेने उमेदवारी दिलेले भीमराव माने हे पूर्वी जयंत पाटील यांचा हात धरून राष्ट्रवादीत आले होते. त्यामुळे त्यांनीही माघार घेतली. आता जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पाटील आणि बंडखोर अभिजित पाटील यांचे आव्हान असेल.