आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, शिवसेना मंत्र्यांना मिळतेय दुय्यम वागणूक - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘आम्हाला सत्तेतून बाहेर पडा म्हणणारे आशिष शेलार कोण? महायुतीचा निर्णय दिल्लीत झाला आहे, ती तोडायची की टिकवायची, हे दिल्लीतच ठरेल’, असे प्रत्युत्तर उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी बुधवारी भाजपला दिले. युती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची कबुली देतानाच ‘राज्याचे सरकार शिवसेनेनमुळेच स्थिर आहे’, अशी आठवणही त्यांनी मित्रपक्षाला करून दिली.

सांगली, मिरजेतील उद्योजकांच्या चर्चासत्राला उपस्थित राहण्यासाठी देसाई बुधवारी सांगलीत आले होते. त्या वेळी युतीतील वादाबाबत पत्रकारांनी विचारले असता देसाई म्हणाले, ‘राज्यमंत्र्यांना स्वतंत्र अधिकार मिळायलाच पाहिजेत. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांबाबत दुजाभाव होतो, हे खरे आहे. ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.’

उद्योगांबाबत ठोस निर्णय होत नव्हते, याचे कारण सरकारच्या अस्थिरतेत होते, हे सांगताना देसाई म्हणाले, ‘नोव्हेंबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी झाला, तेव्हा सरकार डळमळीत होते; मात्र डिसेंबरमध्ये शिवसेनेने युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि ख-या अर्थाने सरकार स्थिर झाले. त्यानंतरच सरकारच्या निर्णयांना गती आली. आम्ही सरकार स्थिर केले तसे उद्योगांनाही स्थिरता आणू’, असेही ते म्हणाले.

खंडणी बहाद्दरांचा बंदोबस्त
देसाई म्हणाले, ‘आम्ही कामगार कायदे बदलायला निघालोय, असा कांगावा केला जातोय. वास्तवीत कामगार हिताच्या एकाही कायद्याला आम्ही हात लावणार नाही. उलट माथाडी कायद्यांच्या आडून लूट करणारयांच्या टोळ्या राज्यभर कार्यरत आहेत. त्यांचा आम्ही पुरता बंदोबस्त करू.’

‘सेझ’बाबत पुनर्विचार
सेझचा प्रयोग फसल्याचे सांगत देसाई म्हणाले, ‘सेझला आमचा विरोधच आहे. महाराष्ट्रात हा प्रयोग फसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी आम्ही सेझचा पुनर्विचार करून याबाबत परखड भुमिका घेवू. सेझऐवजी क्लस्टर डेव्हलपमेंटला आमचे प्राधान्य राहील. सांगली जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना संधी आहे. येथे फुड प्रोसेसिंग क्लस्टर उभारण्यात येईल.’