आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने शिंपडले प्रीतिसंगमावर गोमूत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या वक्तव्याचे ‘पापक्षालन’ करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाजवळ आत्मक्लेश केला. मात्र त्यामुळे ही जागा अपवित्र झाली आहे, असा आरोप करत शिवसेना, भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रीतिसंगमावर गोमूत्र शिंपडून ते पवित्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सातारा शहरातही मोर्चा काढून शिवसैनिकांनी पवारांचा निषेध केला.

इंदापूरच्या सभेत दुष्काळी जनतेबाबत अश्लाघ्य वक्तव्य करणा-या अजित पवार यांनी आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या चुकीचे प्रायश्चित घेण्यासाठी रविवारी प्रीतिसंगमावर उपोषण केले. मात्र शिवसेना, भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळीही निदर्शने करत ‘हे नाटक बंद करा, राजीनामा द्या,’ अशी मागणी केली होती.

सोमवारी सकाळीही या तीन्ही पक्षाचे सुमारे 50 हून अधिक कार्यकर्ते प्रीतिसंगमावर दाखल झाले. ‘अजित पवार यांच्या आत्मक्लेषामुळे यशवंतराव चव्हाणांचे समाधीस्थळ अपवित्र झाले आहे. आम्ही ते पवित्र करतो,’ असे म्हणत या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बाटलीतून आणलेले गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी भाजपचे तालुका सरचिटणीस विष्णू पाटसकर यांच्या हातातील गोमुत्राची बाटली जप्त केली, त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच समाधीस्थळास पुष्पहार अर्पण करून काढता पाय घेतला. कराडमधील आंदोलन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सातारा येथे येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून अजित पवारांविरोधात निदर्शने केली. तसेच जिल्हाधिका-यांना निवेदनही दिले.

इंदापुरातही दावा दाखल
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अजित पवारांविरोधात पुण्यापाठोपाठ इंदापूरच्या कोर्टातही दावा दाखल केला आहे. प्रक्षोभक वक्तव्य करणे, सार्वजनिक जलाशयाचे किंवा झºयाचे पाणी घाण करणे आदी आरोप करत अब्रुनुकसानीचा आरोप पवार यांच्यावर करण्यात आला आहे.