आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Mahalaxmi News In Marathi, Kolhapur, Divya Marathi

नवरात्रासाठी करवीरनगरी सज्ज; विद्युत रोषणाईने मंदिर उजळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या नवरात्रासाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळ, जिल्हा प्रशासन, श्रीपूजक मंडळ, महापालिका प्रशासन यांच्या वतीने सर्व पातळ्यांवर जय्यत तयारी झाली आहे. आता गुरुवारपासून नऊ दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.

गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवशी सकाळी साडेसात वाजता महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. श्रीपाद मुनीश्वर हे पुण्याहवाचन करणार आहेत. गेले दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक तरुण मंडळांनी येथून ज्योत प्रज्वलित करून आपापल्या भागात नेली आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाची धांदल सुरू झाल्याचे दिसून येते. संपूर्ण मंदिराची तांत्रिक साधनांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली असून एलईडीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी आणि सोमवारी देवीचे सर्व दागिने स्वच्छ करण्यात आले. तसेच गाभाऱ्याची व अन्य चांदीच्या साहित्याची स्वच्छता करण्यात आली आहे.

साडेअठरा कोटींचे दागिने देवस्थान समितीने गेल्या वर्षी महालक्ष्मीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले होते. देवीच्या खजिन्यात ३५ किलो ५६० ग्रॅम सोने, ८५१ किलो ९४५ ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. बाजारभावाप्रमाणे या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन साडेअठरा कोटी रुपये झाले आहे.

सप्तशृंगडही सजला
नाशिक | गुरुवारपासून नवरात्रोत्सवासाठी वणी येथील सप्तशृंगगड ट्रस्ट व प्रशासन सज्ज झाले आहे. यावर्षी उत्सवकाळात गडावर १० ते १५ लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गडावर तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच उत्सवकाळात बुधवारच्या रात्रीपासूनच गडावरील दुचाकी व खासगी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
दर पाच िमनिटांनी एक बस याप्रमाणे तब्बल २५० बसेस भाविकंना नांदुरी येथून ने-आण करणार आहेत. यासाठी गडावर मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. मंदिराच्या पहिल्या पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत सुरक्षेसाठी चार डोअर मेटल डिटेक्टर, १२ हॅण्ड मेटल डिटेक्टर, ३० खास सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत.