आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small Dream Not Well, To Spend Life On Big One Dr. Abdul Kalam

छोटी स्वप्ने बाळगणे पापच; उदात्त ध्येयासाठी संपूर्ण आयुष्य वेचा - डॉ. अब्दुल कलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साता-यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याची सांगता रविवारी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, चेअरमन अ‍ॅड.रावसाहेब शिंदे, प्रा.डॉ. एन.डी. पाटील, डॉ. अनिल पाटील, शंकरराव कोल्हे, सचिव डॉ. अरविंद बुरुंगले उपस्थित होते. आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करणा-या कलाम यांनी विद्यार्थी, विशेषत: युवकांना केलेले मार्गदर्शन त्यांच्याच शब्दांत...


कर्मवीरांनी ब्रिटिशांच्या काळात शाळा स्थापन केल्या. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे प्रशिक्षित शिक्षक हे तत्त्व त्यांनी अमलात आणले. शिक्षणासाठी संशोधन आणि चौकसपणा, सृजनशीलता आणि शोधकवृत्ती पाहिजे. केवळ हेच असून चालणार नाही तर समाजहितासाठी सर्वत्र ज्ञान पसरवण्याचे धाडस, कल्पकता आजच्या विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी. तसेच मुलांमध्ये नैतिकतेचे अधिष्ठानही नक्कीच पाहिजे. पालक आणि शिक्षकांनी आपल्याला प्रत्येक विद्यार्थी प्रतिभावान, एकमेवाद्वितीय असाच तयार करायचा आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आज बहुतेक पालक-शिक्षक ‘शेजारचा मुलगा कसा हुशार आहे, तसा तू हो’ असे आपल्या मुलांना सांगत असतात. आज अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मुलांनो, तुम्ही सर्वसामान्य, सर्वसाधारण नाहीतच आणि बनूही नका. माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालत ज्ञान ताजेतवाने ठेवा. ग्रॅहम बेल, एडिसन, मादाम क्युरी, रामानुजन, चंद्रशेखर सुब्रमण्यम या थोर शास्त्रज्ञांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा. काहीतरी भव्यदिव्य करण्याचे उदात्त ध्येय बाळगा आणि त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण आयुष्य वेचा.’


जमिनीवर सरपटता कशाला?
‘तुम्ही जन्मत:च काही क्षमता घेऊन आला आहात. काही कल्पना आणि स्वप्ने तुमच्यातही आहेत, मोठेपणा, आत्मविश्वासाचे पंख तुम्हाला जन्मजात आहेत. मग जमिनीवर सरपटण्याचे कारण काय ? आकाशाला गवसणी घाला... मुलांनो, मोठी स्वप्ने पाहा. मोठे ध्येय बाळगा, अधिकाधिक व नवीनतम ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. कठोर परिश्रम करा, तुम्हाला पंख आहेत, ते आकाशात उडण्यासाठी.... मुक्त मनाने विहार करा आणि पालक, शिक्षकांनीही मुलांना मुक्त विहार करू द्यावा....!


मराठीतून भाषण
‘ नमस्कार, मी सातारा येथे आलो आहे. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्यामुळे फार आनंद झाला आहे. तुम्हाला शुभेच्छा,’ या वाक्याने डॉ. कलाम यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली अन् टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या ‘मराठी प्रेमा’ला विद्यार्थ्यांनी सलाम केला. या वेळी डॉ. कलाम यांनी शरद पवार यांचा उल्लेख माझे त्या वेळचे ‘बॉस’ असा केला.


प्रामाणिकपणाची शपथ
उज्ज्वल भविष्याची साद घालताना डॉ. कलाम यांनी मुलांना ‘आय विल फ्लाय’ ही कविता म्हणायला लावली. तसेच ‘मी चांगला नागरिक होईन. इतरांना सन्मान देईन, कोणतेही काम प्रामाणिकपणे व मनापासून करीन, छोटे ध्येय ठेवणे पाप आहे. हे पाप मी करणार नाही. मी इतरांना काहीतरी नक्की चांगले देईन आणि त्यात आनंद मानेन,’ अशी प्रतिज्ञाही डॉ. कलाम सरांनी मुलांना दिली.


कलामांमुळे देश मजबूत झाला : पवार
‘मी संरक्षणमंत्री असताना डॉ. कलाम आपले तंत्रज्ञानविषयक सल्लागार होते. माझ्या कार्यकाळातच त्यांनी तयार केलेल्या दोन मिसाइलची चाचणी झाली. त्यामुळेच आज जगातील कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही,’ अशी आठवण शरद पवार यांनी बोलून दाखवली.