Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur development issue

सोलापूरचे नेतृत्व हसमुख, जनता मात्र कोमेजलेली !

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2012, 04:22 AM IST

राज्यात सोलापूर सर्वात मागास शहर आहे. येथील कापड गिरण्या बंद पडल्या, नवीन उद्योग येत नसल्याने बेकारी वाढली.

  • solapur development issue

    सोलापूर - राज्यात सोलापूर सर्वात मागास शहर आहे. येथील कापड गिरण्या बंद पडल्या, नवीन उद्योग येत नसल्याने बेकारी वाढली. महापालिकेतील सत्ताधारी कॉँग्रेस स्वार्थी असून त्यांना शहराच्या विकासाबाबत काहीही देणेघेणे उरलेले नाही. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या शहराच्या विकासासाठी ठोस काहीही केलेले नाही. सोलापूरचे नेतृत्व हसमुख असले तरी पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नसल्याने येथील जनतेचे चेहरे मात्र कोमजलेले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शिंदेंवर सोमवारी प्रथमच जाहीर टीका केली.
    महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने राज्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. आता या दोन्ही मित्रपक्षांचे केंद्रातील नेतेही यात उतरल्याचे आज दिसून आले. राष्ट्रवादी कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये आयोजित जाहीर सभेत पवार म्हणाले की, शाहराच्या विकासाचा दृष्टिकोन नसलेल्या सत्ताधा-यांनी पालिकेत मुळासकट बदलून राष्ट्रवादीला संधी द्या, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वत: लक्ष देईन. सुशीलकुमार शिंदे राज्याचा अर्थसंकल्प नऊ वेळा मांडल्याचे सांगतात. मात्र, ही संधी उपलब्ध करून देणा-या सोलापूरकरांसाठी त्यांनी अर्थसंकल्पात काय केले? केंद्राच्या मदतीने राज्यात टेक्स्टाइल पार्क सुरू झालेत, पण त्यात सोलापूरचा समावेश नसल्याने वाईट वाटते. येथील सत्ताधा-यांनी त्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र, त्यांनी कोणतीही मागणी केली नाही.
    कॉँग्रेसने सोलापुरात मेट्रो रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याव सिद्धेश्वर एक्स्प्रेसला जादा डबा जोडण्यासाठी पाठपुरावा न करणारे नेते मेट्रो काय सुरू करणार? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. शिंदे हे दिल्ली किंवा मुंबईतच असतात. त्यांनी राष्ट्रपतीही व्हावे. ते कोणीही झाले तरी काहीच करणार नसल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
    बाहेरच्यांनी आम्हाला शिकवू नये : सुशीलकुमार शिंदे - दर पाच वर्षांनीच निवडणुका होतात. मात्र, यंदा गमत्याजमत्या, खुळखुळेवाले यांनी येऊन आपली करमणूक केली. आम्ही चिखलात दगड टाकत नाही. बाहेरच्यांनी येऊन आम्ही काय करावे ते शिकवू नये, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रचारसभेत पवारांवर टीका केली. मी नऊ वर्षे अर्थमंत्री असताना एकदाही तिजोरीच्या चाव्या माझी हाती आहेत, असे म्हणालो नाही. देशातील सर्वाधिक कर पिंपरीत जमा होतो. त्यामुळे तेथे आम्ही विकास केला हे सांगणे चुकीचे आहे. ‘एनटीपीसी’साठी 2 टीएमसी पाणी न देऊ शकलेले सोलापूरला कुठून पाणी देणार? अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या आश्वासनांचा समाचार घेतला.Trending