आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिस, सनातनी प्रवृत्तीवर अहिंसा हेच चोख उत्तर : श्रीपाल सबनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘नथुराम गोडसेची परंपरा ही मारेकऱ्यांची आहे. ती देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याला घातक आहे. ‘इसिस’चा दहशतवाद काय आणि अशा सनातनी प्रवृत्ती काय, यावर भगवान महावीर आणि गौतम बुद्धांचा अहिंसेचा संदेश हेच चोख उत्तर असेल,’ असे परखड मत पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.

लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आदर्श सेवक पुरस्कारांचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या गव्हर्निंग काैन्सिलचे अध्यक्ष सुरेश पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. सबनीस म्हणाले, ‘इसिस’च्या दहशतवादाने सारे जग भयभीत झाले आहे. हा दहशतवाद कसा रोखायचा हा साऱ्या जगापुढे प्रश्न आहे. इस्लामचा मीही अभ्यास केला आहे. मुल्ला, मौलवींनी इस्लामचा चुकीचा अर्थ सांगितल्याने इसिससारखे राक्षस निर्माण झाले आहेत. आपल्याकडे नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. गोडसेचा गौरव करण्यासारखी दुसरी विघातक प्रवृत्ती नाही. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी अशा विचारवंतांची हत्या होते तरीही अशा प्रवृत्तींना रोखण्यात आपले सरकार संवेदनाशून्य दिसते. या संवेदनशून्यतेतूनच साहित्यिकांमध्ये दुफळी निर्माण होते. कोणीही साहित्यिकावर राजकीय पक्षाचा शिक्का नसतो; पण राजकीय हेतूने त्यांच्यामध्ये फूट पाडली जाते. हा फुटीरतावाद देशाची समता, संस्कृती आणि ऐक्यालाही घातक आहे. लेखकांनी याचे भान ठेवले पाहिजे. प्रतिभावंतांनी एकत्र येऊन समाज आणि सरकारला जागृत केले पाहिजे. सरकार हे आपलेच असते. भानावर आणण्यासाठी आपण त्याला हलवले पाहिजे. कोणत्याही पक्षाला राक्षस ठरवून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. समाज, साहित्यिक आणि सरकार यामध्ये संवादाचे पर्व समृद्ध होण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षाही डाॅ. सबनीस यांनी व्यक्त केली.
आमिरचे वक्तव्य असमर्थनीय
आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेले वक्तव्य हे सहजपणाची भावना होती, असे सांगताना डॉ. सबनीस म्हणाले, ‘आमिरच्या हिंदू पत्नीला आपल्या मुस्लिम पतीपासून झालेल्या बाळाच्या सुरक्षिततेची चिंता वाटली. ती सध्याची परिस्थिती पाहता योग्यही वाटते; पण आमिरने गदारोळानंतर केलेला खुलासा पहिल्यांदा ट्विट करतानाच करायला हवा होता. ज्या देशाने त्याचे सिनेमे डोक्यावर घेतले त्या देशासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार आहोत, हे त्याने आधीच सांगितले असते तर हा गदारोळ झालाच नसता.’
नेमाडेंनी मार्गदर्शक व्हावे
साहित्य संमेलने ही सांस्कृतिक लोकशाहीची प्रतीके आहेत. ती महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा टिकवण्याचे काम करतात, असे डॉ. सबनीस म्हणाले. ‘भालचंद्र नेमाडे हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. त्यांनी संमेलनाला यावे, नवोदितांना मार्गदर्शन करावे ही आमची अपेक्षा आहे. संमेलने ही रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे; पण तो खरेच रिकामटेकड्यांचा उद्योग आहे का, हे त्यांनी एकदा संमेलनात येऊन ठरवावे,’ असे आवाहन त्यांनी केले.