आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM Chavan Comment On Ajit Pawar And Raj Thackeray

दुष्काळाचे राजकारण: मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांनी पाजले राज ठाकरे, अजित पवारांना डोस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली/सोलापूर- ‘सध्या राज्याला दुष्काळाचे चटके बसत आहेत. या गंभीर परिस्थितीत एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे योग्य नाही. त्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वनमंत्री डॉ. पतंगराव कदम व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्‍ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘डोस’ पाजले.
राज ठाकरे व अजित पवार यांच्यामध्ये सध्या आरोप- प्रत्यारोपांची ‘होळी’ खेळली जात आहे. पवारांनी सिंचनात पैसे लाटल्यानेच राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा राज यांचा आरोप आहे. त्यावर आक्रमक झालेल्या पवारांनी राज यांना जशास तसे उत्तर देण्याचा धमकीवजा इशारा दिला होता. या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने हिंसक आंदोलनेही झाली. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना इतके दिवस शांत असलेल्या काँग्रेस नेत्यांनी आता दोघांनाही सामंजस्याने राहण्याचा सल्ला दिला आहे.

दुष्काळग्रस्त भागाला मदत करा : पतंगराव
सांगलीत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. या काळात एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा जनतेला मदत करण्यावर राजकीय नेत्यांनी भर द्यायला हवा. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नळ पाणी योजनांची दुरुस्ती आणि एका स्रोतापासून दुसºया स्रोतापर्यंत पाणी नेण्यासाठी उपाय करण्यावर 1 कोटी रुपये खर्चाचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 25 लाख रुपये खर्चाचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. यामुळे सिंचन योजनांतूनही तहानलेल्या गावांना पाणी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी सात दिवसांत योजना तयार करून त्याची कामे सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

दौरा करा, पण राजकारण नको : मुख्यमंत्री
सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, वैश्विक मंदीच्या लाटेत देशाच्या आर्थिक प्रगतीचा दर घसरला आहे. राज्यांत यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. अशा स्थितीचा सामना सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. दुष्काळाचे कोणी राजकारण करू नये. महाराष्‍ट्रची जनता हे कदापि खपवून घेणार नाही. राज्यात दौरे अवश्य करा, पण राजकारण करू नका.