आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी आमदारांशी चर्चा करुनच राजीनाम्याचा निर्णय- अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी । सातारा
‘इंदापूरच्या सभेतील वक्तव्याबाबत मी विधिमंडळात व बाहेरही माफी मागितली आहे. माझ्या दृष्टीने हा निर्णय संपला आहे. आता विरोधकांनी हा विषय जास्त ताणू नये. विरोधकांकडून माझा राजीनामा मागितला जात असला तरी मला सभागृहाचा नेता व उपमुख्यमंत्री बनविणारे आमदारच याबाबतचा निर्णय घेतील. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राजीनाम्याचा विषय टाळला.

फलटण नगरपालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्र आणि पाणी वितरण व्यवस्थेचे उद्घाटन गुरुवारी पवारांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, यापूर्वी मी राजीनामा दिला होता तो निर्णय माझा स्वत:चा होता. मात्र, त्यानंतरही माझ्या आमदारांनी मला पक्षाचा नेता व उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा विराजमान केले. त्यामुळे आता त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे.

‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचे चित्रीकरण धोम धरण परिसरात झाले. यासाठी धरणात भराव टाकण्यात आला. पाण्याचा अपव्यय झाल्याचे वृत्त आले. यावर पवार म्हणाले, परिसरात शूटिंगला सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, नियमांच्या उल्लंघनाबाबत संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन मगच त्यावर निर्णय घेतला जाईल.

सुराज्य नव्हे...यांनी तर शूऽऽराज्य केले
सुराज्याची संकल्पना घेऊन महाराष्‍ट्र निर्मिती झाली. परंतु, राज्यकर्त्यांनी त्याचे शूऽऽराज्य केले. लाज वाटावी असे ते बोलतात. समाजाच्या सर्व स्तरांतून राजीनाम्याची मागणी होत असतानाही अजित पवारांना सत्ता सोडवत नाही. शरद पवारच याबद्दल निर्णय घेतील. राज्यकर्ते तकलादू आहेत. त्यांचे वर्तन ठीक नाही.’’
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
(पुणे येथील कार्यक्रमात बोलताना)