आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली- गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे विकासाचे नव्हे, धर्मांधतेचे मॉडेल आहेत, अशी खरमरीत टीका गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शनिवारी येथे केली.
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात सांगली येथे झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीचा बालेकिल्ला म्हणून हा भाग ओळखला जातो. येथे शिक्षणाची चळवळ राबवून मागासांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महात्मा फुले, कर्मवीरअण्णा, बापूजी साळुंखे यांसारख्या समाजसुधारकांनी केले. असे असताना जातीयवादी पक्षाचा उमेदवार पदवीधर मतदारसंघातून निवडून येतो, हा समाजसुधारकांच्या विचारांचा पराभव आहे. ही बाब शरमेची आहे.
‘जातीयवादी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देवदूत गवसल्याचे वातावरण निर्माण करत आहेत. मोदी हे विकासाचे मॉडेल म्हणून जनतेच्या मनावर प्रतिमा बिंबवली जात आहे. ते जर विकासाचे मॉडेल असते तर साक्षरतेत, दरडोई उत्पन्नात, औद्योगिक विकासात, शेतकर्यांच्या विकासात, विजेच्या दरडोई वापरात गुजरात महाराष्ट्राच्या मागे का? नरेंद्र मोदी हे मॉडेलच असेल तर ते धर्मांधतेचे आहे, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहा,’ असेही ते म्हणाले.
धर्माची संकल्पना कुठेच नाही
आपल्याला देश महात्मा गांधीजींच्या विचाराने पुढे न्यायचा आहे की नथुराम गोडसेच्या, या देशाचे ऐक्य टिकवायचे की जातीजातीत तेढ निर्माण करणार्यांच्या पाठीशी राहायचे, हे ठरवावे लागेल. धर्माच्या आधारावर देश ही संकल्पना जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी झालेली नाही, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.