आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत ‘राष्ट्रवादी’च्या मेळाव्यात जेवणावळीत हाणामारी, दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - पदाधिकारी निवडीसाठी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात गुरुवारी कार्यकर्त्यांनी राडा केला. जेवणावळीत झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीचा प्रकार घडला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी मात्र या प्रकारानंतर मेळाव्यातून पाय काढता घेणे पसंत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी गुरुवारी सांगलीत पक्षाचा मेळावा बोलावण्यात आला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नेमणूकपत्रे वाटप करण्यात येणार होती. त्यासाठी प्रत्येकाने अापपल्या समर्थकांना अाणून जणू शक्तिप्रदर्शनच केले हाेते. नेमणुकीची पत्रे दिल्यानंतर जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाले. मेळाव्यानिमित्त कार्यकर्त्यांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अनेक कार्यकर्ते सभागृहाबाहेर येऊन जेवणावळीत घुसले.
या वेळी किरकोळ कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. नशेत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी हाणामारीच सुरू केली. कोण कोणाला आणि कशासाठी मारहाण करतो आहे हे कळतच नव्हते. या वेळी राष्ट्रवादी कार्यालयाच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यात कार्यालयाच्या काचा फुटल्या. जयंत पाटील आत काँग्रेसमधील दुफळीवर बोलत होते आणि बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडत होते, असे चित्र होते. बाहेर कार्यकर्त्यांचा राडा सुरू असल्याचे समजताच जयंत पाटील यांनी मात्र कोणालाही समजावण्याच्या फंदात न पडता काढता पाय घेतला.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक पदाधिकारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी मेळाव्यासाठी आणलेले कार्यकर्तेही त्यांच्याच ‘कर्तबगारी’चे असल्याने मेळाव्यात गोंधळ झाल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह बंदिस्त आणि छोटे आहे. तेथेही जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते मध्येच घोषणाबाजी करत होते, काही जण झेंडे फडकावत होते. एकूणच या मेळाव्याला बेशिस्तीची किनार होती.
बातम्या आणखी आहेत...