कोल्हापूर- जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापारी व व्यावसायिकांच्या ३५ संघटनांनी शहरातून रॅली काढून सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘जीएसटी’च्या जाचक अटी रद्द करून जीवनावश्यक वस्तूं करातून वगळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
केंद्र सरकारमार्फत १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. या विरोधात राज्यातील व्यापाऱ्यांनी आज बंदची हाक दिली. कोल्हापूरातील सर्व व्यापाऱ्यानी सहभागी होत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली. दुपारी साडेबारा वाजता शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. राजाराम रोडवरील चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयापासून राजारामपुरी, बिंदू चौक, गुजरी, महाद्वार रोड, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, ग्रीन मर्चंट असोसिएसनचे अध्यक्ष किशोर तांदळे, प्रदिपभाई कापडीया, जयेश ओसवाल, रणजित पारेख, रमेश कार्वेकर, बाबाराव कोंडेकर, चंद्रकांत जाधव, संजय शेटे, श्रीनिवास मिठारी, वैभव सावर्डेकर, नयन प्रसादे, गणेश सन्नका आदी उपस्थित होते.
शासनाने जीएसटीत जीवनावश्यक वस्तू तथा अन्नधान्य, कपडे यावर कर लावणार नसल्याचे सांगितले होते. पण अंमलबजावणीत मात्र ब्रॅन्डेड अन्नधान्य व कपडयावरही ५ टक्के कराची आकारणी करणार असून याचा फटका प्रत्यक्ष सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे शासनाने या करातील त्रुटी दूर करण्यात याव्यात अशी मागणी ललित गांधी यांनी यावेळी केली.