आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: साडेअकरा कोटींचा बोनस पती-पत्नीच्या संयुक्त खात्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - एकीकडे राज्यातील अनेक सहकारी दूध संघ डबघाईला आलेले असताना गुणवत्तेच्या जोरावर मुंबईच्या बाजारात स्थान टिकवून असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ तथा ‘गोकुळ’ने अनेक विधायक परंपराही जोपासल्या आहेत. दिवाळीचा बोनस केवळ कर्मचाऱ्यांच्या हातात न देता तो त्याच्या आणि पत्नीच्या संयुक्त खात्यावर जमा करण्याचा पायंडा ‘गोकुळ’ने गेल्या १२ वर्षांपासून पाडला आहे. यंदाच्या दिवाळीत तब्बल ११ कोटी ५० लाख रुपये या पती-पत्नीच्या संयुक्त खात्यावर टाकण्यात येत आहेत.

दिवाळीचा बोनस हा कर्मचाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर अनेक वेळा तो पूर्णपणे घरी जाईलच याची शाश्वती नसे. अनेक कर्मचाऱ्यांच्या बाहेरच्या उधाऱ्या भागवण्यासाठीच हा बोनस वापरला जायचा आणि घरातील महिलेसमोर पुन्हा आर्थिक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे. अनेकदा काही गृहिणींनी याबाबत ‘गाेकुळ’कडे वैयक्तिक तक्रारीही केल्या. बारा वर्षांपूर्वी तत्कालीन चेअरमन अरुण नरके हे जिल्हाभर संपर्क सभांच्या माध्यमातून फिरत असताना त्यांना ही बाब जाणवली. त्यामुळे नरके यांनीच आपल्या सहकारी संचालकांशी चर्चा करून दिवाळीच्या बोनसची रक्कम ही केवळ गोकुळच्या कर्मचाऱ्याच्या नव्हे, तर त्याच्या पत्नीच्या नावासह असलेल्या संयुक्त खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारा वर्षांपूर्वीच अशी संयुक्त खाती उघडण्यात आली. त्यामुळे पत्नीच्या सहीशिवाय बोनस काढताच येत नसल्याने किमान तो किती रुपये आला आहे, हे सांगण्याची तरी तसदी नवऱ्यांना घ्यावी लागते.
पत्नीच्या सहीनंतरच पैसे
गोकुळमध्ये सध्या १६३८ कायम कामगार आहेत. यांना किमान १८ हजारांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत बोनस मिळतो. यंदा ही रक्कम सुमारे ११ कोटी ५० लाख रुपये झाली आहे. ही सर्व रक्कम दरवर्षीप्रमाणे संयुक्त खात्यावर जमा होणार असून पत्नीची सही घेतल्यानंतर हे पैसे काढता येणार आहेत. यामुळे घरोघरी किमान पत्नीचे मत विचारात घेऊन तिला काही हवे नको पाहून मग पैसे खर्च करण्याची सवय कर्मचाऱ्यांना लागली आहे. एखाद्या सहकारी संस्थेने अशा विधायक योजनेच्या माध्यमातून एखादा निर्णय घेतला, तर तो किती सुसह्य ठरतो याचे हे उदाहरण आहे.
पुढे वाचा.. योजनेमुळे महिलांचा सन्मान