आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sundar Elephant Case Jetly File Case Against MLA Kore

सेलिना जेटलीकडून आमदार कोरेंविरोधात तक्रार; आज सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्योतिबा देवस्थानला देण्यात आलेल्या सुंदर हत्तीला बंदिस्त करून ठेवले असतानाच त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे अभिनेत्री सेलिना जेटली हिने सुंदरचा माहूत आणि आमदार विनय कोरे यांच्याविरोधात कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे दरम्यान, सुंदर हत्तीला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.

वारणा उद्योग समूहाने दान म्हणून दिलेल्या सुंदर हत्तीला 2012 पासून जोतिबा देवस्थान येथे ठेवण्यात आले. या हत्तीच्या सुटकेसाठी पेटा या प्राणीविषयक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. दोन वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर उच्च न्यायालयाने सुंदरला बंगळुरू येथे हलवण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. यानंतर आमदार कोरे यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर याच महिन्यात सुंदरची तपासणी केली असता त्याच्या पायाला साखळदंड करकचून बांधल्याने मोठी जखम झाली आहे. 12 मे रोजी सुंदरची घेतलेली छायाचित्रे पेटाने प्रसिद्ध केल्याने सुंदरबाबत सहानुभूती वाढू लागली आहे.

दरम्यान, युनायटेड नेशन्सच्या फ्री अँड इक्वल या मोहिमेची ब्रँड अँम्बेसेडर असलेल्या सेलिना जेटली हिने ही तक्रार दाखल केली आहे. तसेच दिल्ली येथील पीपल फॉर अँनिमल्स या संस्थेचे नरेश कड्यान यांनीही कोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचा पती डॉ. श्रीराम नेने यांनीही कोरे यांना पत्र पाठवून हत्तीची सुटका करण्याची विनंती केली होती.