आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची पत काढू नका; तुमच्या पदवीचे काय, सांगलीत सुनील तटकरेंचा तावडेंना टाेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘तावडेसाहेब, आमची पत काढण्यापूर्वी तुमच्या शैक्षणिक पदवीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला आधी द्या. आमच्या भवितव्याची काळजी करू नका’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाेलताना तटकरे यांनी दुष्काळप्रश्नावर सरकारच्या विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रान उठवावे, असे आवाहनही केले.

वारणा मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, पक्ष निरीक्षक राजलक्ष्मी भोसले अादी उपस्थित होते. ‘अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची जनतेत पत राहिली नसल्याने शरद पवार यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे’, अशी टीका भाजपचे नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याला उत्तर देताना तटकरे म्हणाले, ‘भाजप सरकारविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणे-घेणे नाही. त्यांना ग्राहकहित महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतीमालाचे दर वाढतील, ही आता अपेक्षाच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही या सरकारला जाब विचारू लागल्यानेच तावडेंना मिरच्या झोंबल्या आहेत. आमची पत काय आहे, ते जनता दाखवेल. तुमच्या बोगस पदवीचे काय? याचे आधी महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यावे.’

माेदींचा अादर्श बाेगस : पाटील
माजी मंत्री जयंत पाटील यांनीही भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘या राज्याचा शिक्षणमंत्री अल्पशिक्षित असेल तर ते मान्य आहे; पण बोगस डिग्री घेऊन ते जनतेला काय आदर्श देणार? महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांच्या बोगस डिग्री उघड झाल्यात. यांच्या केंद्रातील शिक्षणमंत्रीच बारावी झालेल्या असतील तर देशाच्या शिक्षणाची काय अवस्था होणार, याची कल्पनाच न केलेली बरी. नरेंद्र मोदी देशात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तो भ्रष्टाचाराचा, बोगसपणाचा निर्माण होतोय.’