आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात तीन टोलनाके पेटवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणा-या टोलवसुलीविरोधात आंदोलनाचे शस्त्र उपसलेल्या कोल्हापूरकरांच्या संतापाचा रविवारी मध्यरात्री स्फोट झाला. आयआरबी कंपनीने शहरात उभारलेल्या तीन टोलनाक्यांवरील 18 बंद केबिन्स अज्ञात लोकांनी जाळून टाकल्या. शहरात सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचे सांगत पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोल्हापुरात गेल्या दीड वर्षापासून टोलविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामान्य नागरिक, महिलांसह विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते. यापूर्वी आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना पिटाळून लावण्यापासून केबिनची तोडफोड यासारखे प्रकारही घडले आहेत.

दरम्यान, रविवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी कसबा बावडा, शिवाजी विद्यापीठाजवळील व फुलेवाडी या तीन टोलनाक्यांवर हल्लाबोल केला. येथे उभारण्यात आलेल्या केबिन्सवर रॉकेल, पेट्रोल टाकून या केबिन्स पेटवण्यात आल्या. रात्रीची वेळ असल्याने व फारशी वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा पोलिसांना कळाला. यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस पोहोचण्याआधीच बहुतांशी केबिन्स खाक झाल्या होत्या.या प्रकरणी राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून शहानिशा करून पुढील कारवाई करणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक महेश सावंत यांनी सांगितले.

शिवसेनेने घेतली जबाबदारी
शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.‘मुख्यमंत्र्यांना मी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्याचे हा प्रसंग उद्भवला. आता तरी आमच्या भावना शासनाला समजल्या असतील. त्यामुळे लवकरात लवकर टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

राज ठाकरेंच्या दौ-यांचा मुहूर्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी व मंगळवारी कोल्हापुरात आहेत. मंगळवारी त्यांची जाहीर सभाही होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने टोलनाके पेटवून स्थानिक प्रश्नाबाबत आपण आक्रमक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय किनार असल्याचीही चर्चा शहरात होती.