आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सह्याद्री’त वाघांसाठी भक्ष्य वाढवण्याची मोहीम; वाघ संवर्धनाचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एकमेव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सांबर, चितळ, हरिण अशी वाघांचे खाद्य असलेले प्राणी सोडण्यात येत आहेत.

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकही व्याघ्र प्रकल्प नव्हता. या ठिकाणी जगातील दुर्मिळातील दुर्मिळ जातीचे अनेक प्राणी आढळतात; मात्र जंगलाची मोठी व्याप्ती आणि सदाहरित जंगल असल्याने वाघांची संख्या निश्चित करता येत नव्हती. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्यात अडचणी येत होत्या. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने ‘सह्याद्री’ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. त्यामुळे वाघांचे अस्तित्व टिकवून त्यांची संख्या वाढवणे, हे वन विभागापुढे मोठे आव्हान होते. त्यातच गेल्या दोन-तीन व्याघ्रगणनांमध्ये
‘सह्याद्री’त वाघांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही.

म्हणून वन विभागाने आता वाघांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाच्या परवानगीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून चांदोली राष्ट्रीय उद्यानात गुरुवारी नर-मादी सांबरांच्या दोन जोड्या सोडण्यात आल्या. गेल्या आठवड्यात चितळाची एक आणि सांबराची एक जोडी सोडण्यात आली आहे.

परवानगी मिळाली
वन विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी वर्षभरापूर्वीच सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यातून सांबर, चितळांच्या जोड्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्याला राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाची परवानगी मिळाली नव्हती. आता ती परवानगी मिळाल्याने सागरेश्वर अभयारण्य आणि पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून सांबर व चितळ सोडण्यात आले आहेत.

हरणांची काळजीपूर्वक हाताळणी
सागरेश्वर आणि कात्रज येथून आणलेल्या हरणांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याचे काम पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे किरण नाईक, मानद वन्यजीव संरक्षक अजित पाटील यांच्या देखरेखीखाली केले जाते. हरणांना तेथील वातावरणाची सवय व्हावी, यासाठी चांदोलीत खास कुंपण घालून स्वतंत्र कक्ष तयार केला.

बाहेरून हरणे आणल्यानंतर त्यांना वातावरणाची सवय झाली की दोन ते तीन दिवसांनी जंगलात सोडली जातात.

आणखी 20 जोड्या सोडणार
सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य हरणांच्या संगोपनासाठी प्रसिद्ध आहे. येथील हरणांची संख्याही मोठी आहे. शिवाय त्यांना चांदोलीत वाहतूक करून नेणे सोयीचे असल्याने सागरेश्वरमधून आणखी 20 हरणांच्या जोड्या चांदोलीत सोडण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक एस.एल. झुरे यांनी सांगितले.