आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Agitation: Kolhapur's 2 Police Officers Suspended

टोल आंदोलन:कोल्हापूरचे 2 पोलिस अधिकारी निलंबित,हिंसाचारप्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरातील टोलनाके जाळपोळप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहर पोलिस उपअधीक्षक विठ्ठल पवार आणि पोलिस निरीक्षक यशवंत केडगे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी त्यांच्या निलंबनाची बातमी कळताच नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘आयआरबी’ कंपनीने कोल्हापुरात उभारलेल्या रस्त्यांवर टोल वसुलीस कृती समितीने व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. लोकांच्या दबावापुढे झुकत 11 जानेवारी रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोल रद्द केल्याची घोषणा केली होती; परंतु दुस-याच दिवशी सकाळी आयआरबी कंपनीने पुन्हा टोलवसुली सुरू केल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या संतापाचा उदे्रक होत शहरातील सर्व टोलनाके उद्ध्वस्त करून पेटवून देण्यात आले होते.
काही टोलनाक्यांवर पवार आणि केडगे उपस्थित असतानाही जाळपोळ झाली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आल्यानंतर या दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला व त्यांना निलंबित करण्यात आले. ही बातमी कळताच टोलविरोधी कृती समितीने दुपारी तातडीची बैठक घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचा निषेध केला. सिंग यांनी जाणीवपूर्वक या दोघांना टार्गेट करण्यासाठी तसा अहवाल पाठवून हे निलंबन घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला.
कोल्हापूर पेटले असते...!
टोलविरोधी कृती समितीचे अध्यक्ष निवास साळोखे म्हणाले की, मंत्र्यांनी घोषणा करूनही आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरूच ठेवल्याने शेकडो कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता. या स्थितीत पवार व केडगे यांनी आततायी भूमिका न घेता संयमाने आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी लाठीमार केला असता, तर आंदोलन आणखी पेटले असते व नंतर ते पोलिसांच्या आवाक्यात आले नसते. अशा स्थितीतही ज्योतिप्रिया सिंग यांना आयआरबी कंपनीच प्रिय वाटत असेल, तर त्यांनी सरकारी नोकरी सोडून या कंपनीतच चाकरी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयआरबी कंपनीच्या टोलवसुलीला शासनाने पोलिस संरक्षण दिले होते. अशा परिस्थितीत टोल नाके जाळण्यात आल्याने आता शासनाला न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे. त्यासाठीच या दोघांचे निलंबन करण्यात आल्याची चर्चा पोलिस दलात सुरू होती.
‘सरकारमध्ये पत नसेल, तर मंत्र्यांनी राजीनामे द्यावे’
‘सांगलीचा टोल बंद करण्याइतकी तुमची सरकारमध्ये पत नसेल, तर राजीनामे देऊन बाजूला व्हा,’ असे आव्हान टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील या आपल्या जिल्ह्यातील नेत्यांना दिले. दरम्यान, टोल वसुली करणारी कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या विरोधात अ‍ॅड. अमित शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीच्या विरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे.