आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल रद्दच्या निर्णयामुळे सांगलीत आनंदोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सांगलीतील मुदत संपलेली टोल वसूल आता बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी मुंबईत घेताच सांगलीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, टोल बंदीचे लेखी आदेश आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी सावध भूमिका कृती समितीने घेतली आहे.
सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला पर्यायी पूल 1998 मध्ये बांधण्यात आला. त्याच्या खर्चाची वसुली करण्यासाठी लावलेल्या टोलची मुदत गेल्या वर्षी संपली, तरीही ठेकेदाराने केलेल्या जादा खर्चाच्या वसुलीच्या नावाखाली लवादाने ठेकेदाराला टोल वसुलीसाठी पुन्हा सहा वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ बेकायदा असल्याचे सांगत टोलविरोधी कृती समितीने सांगलीत अकरा दिवस ठिय्या आंदोलन केले.
छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगलीच्या मुद्द्यावर मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्याला सांगलीतील कृती समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. लवादाचा निर्णय चुकीचा असल्याची भूमिका मांडत समितीने टोल रद्द करण्याची मागणी केली. यावर भुजबळ यांनीही चुकीच्या पद्धतीने टोल वसुली होत असल्यास लवादाच्या निर्णयाची चौकशी केली जाईल आणि टोल बंद करण्यासाठी सरकार न्यायालयात जाईल, असे स्पष्ट केले. तोपर्यंत ठेकेदाराने टोल वसूल करू नये, असे आदेश त्यांनी बजावले.