आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात टोल वसुली सुरु : महापौरांना धक्काबुक्की, सर्व नगरसेवकांचे राजीनामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरकरांनी टोल भरण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या तोडफोड व जाळपोळीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे. मात्र, टोल सक्तीने वसूल केला जात नाही. मात्र टोलवसुली सुरु केल्याने त्यांच्या निषेधार्थ करवीरनगरीचे महापौर सुनीता राऊत यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन केले. यावेळी महापौरांसह नगरसेवकांना धक्काबुक्की झाल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर महापालिकेतील सर्वपक्षीय 82 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
कोल्हापूरातील आरके नगर, शाहू नाका, फुलेवाडी, शिरोली फाटा, ऊसगाव आदी नाक्यांवर आज सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात टोलवसुली सुरू करण्यात आली. कोल्हापूरमधील स्थानिक लोकांना टोलवसुलीची सक्ती करण्यात येत नाही. एमएच 09 दिसणा-या गाड्यांना टोल न भरताच सोडण्यात येत आहे. मात्र इतर बाहेरच्या गाडीचालकांकडून टोल आकारला जात आहे.
कोल्हापूरमधील टोलविरोधी कृती समितीने गेल्या महिन्यात टोल वसुलीविरोधात आंदोलन पुकारले होते. त्यानंतर 12 जानेवारीला शिवसैनिकांनी टोलनाकेच पेटवून दिले होते. त्यामुळे काही दिवस हा वाद सोडविता येईल का याची चाचपणी सुरु होती. मात्र अद्याप त्याला यश आले नाही. महिन्याभराच्या कालावधीनंतर आयआरबी कंपनीने स्थानिक पोलिस प्रशासनाला पत्र देऊन सुरक्षा पुरविण्याची विनंती केली होती. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा टोलवसुली सुरू झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील नेते व मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी पालिकेचे भूखंड विकून व केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत योजनेतून रस्ते विकास केल्याचे दाखवून निधी मिळवून आयआरबीला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. तोपर्यंत हा वाद सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.