आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Collection Stop In Sangali, Today City Shut Down

दबावामुळे सांगलीत टोलवसुली तूर्त बंद, आज शहर बंदची हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - कोल्हापूरपाठोपाठ सांगलीही टोलमुक्त करण्यासाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कृती समितीने बुधवारी शहर बंदची हाक दिली आहे. तसेच जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत साखळी ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, लोकांच्या दबावामुळे ठेकेदाराने तूर्त वसुली थांबवली आहे.
मुदत संपलेल्या टोलची वसुली थांबवावी, या मागणीसाठी स्वातंत्र्यसैनिक बापुसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी मुंबईत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टोल बंद करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे कृती समितीने आता बंदची हाक दिली आहे. कराराची मुदत संपल्याने टोल बंद करण्याचा निर्णय शासन स्वत:च्या पातळीवर घेवू शकते. त्यामुळे शासनाने कोणतीही सबब न सांगता तातडीने टोल बंद करावा, अशी मागणी मंगळवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली.
कृती समितीचे कार्यकर्ते सोमवारपासूनच टोल नाक्यावर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ठेकेदाराने स्वत:हून टोल वसुली बंद ठेवली आहे. कृती समितीनेही कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र शासनाचा निर्णय सकारात्मक आला नाही तर आंदोलनाची दिशा बदलावी लागेल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.
ठेकेदाराशी तडजोडीस राज्य शासन तयार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी मंगळवारी कृती समितीच्या शिष्टमंडळाला शासन ठेकेदाराशी तडजोड करायला तयार असल्याचे सांगितले. ‘तडजोडीची रक्कम ठेकेदाराला देऊन न्यायालयात जावून टोल वसुली बंदचा आदेश आणण्यात येईल. दोन दिवसांत ठेकेदाराला बोलावून ही प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन सचिवांनी दिले आहे,’ अशी माहिती कृती समितीचे सदस्य व खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.