आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलला ठेकेदाराचाच झोल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - जनभावना पायदळी तुडवून टोल वसुलीला दिलेली स्थगिती उठवून शासनाने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पित्त खवळलेल्या टोलविरोधी कृती समितीने सरकारविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. ‘हिंमत असेल तर टोल वसुली कराच’ असे आव्हान कोल्हापूराकरांनी थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर नऊपैकी पाच टोलनाक्यांचे ठेके घेतलेले कोल्हापूरचे कंत्राटदार विनय कदम यांनी या कामाचा ठेका सोडत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे टोलविरोधी आंदोलनाला बळकटी मिळाली आहे.

दोन वर्षांपूर्वी आयआरबी कंपनी आणि महापालिकेमध्ये करार होवून शहरात रस्ते विकास प्रकल्प राबवण्यात आला. परंतु शेवटच्या टप्प्यात ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून आले. तसेच युटिलिटी शिफ्टींगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आयआरबी कंपनीविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त झाला. यातूनच टोल वसूलीला विरोध करत हा प्रश्नावर लढा देण्यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांमध्ये या समितीने महामोर्चापासून ते काळे झेंडे दाखवण्यापर्र्र्यंत अनेक आंदोलने केली. अनेक बैठका झाल्या. कोल्हापूर शहरातील काही टोलनाके जाळण्याच्या घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वसुलीला स्थगिती दिली होती. काही दिवसांनी ही स्थगिती उठवून 13 मे रोजी टोल वसुलीची अधिसूचना जारी करण्यात आली. ही बातमी कळताच टोलविरोधी कृती समितीने महामेळावा घेवून ‘हिंमत असेल तर टोल वसुल करून दाखवा’ असे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले आहे. प्रा. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी, निवास साळोखे, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक आदी या मेळाव्याला उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोल्हापूरकरांचा अंत पाहू नका, समितीचे आवाहन
कोल्हापूरचेच असलेले विनय कदम यांच्याकडे शहरातील 9 टोलनाक्यांपैकी 5 नाक्यांच्या वसुलीचा ठेका होता, परंतु कोल्हापूरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण हा ठेका सोडत असल्याचे मंगळवारी कदम यांनी जाहीर केले. टोलविरोधी कृती समितीने याबाबत समाधान व्यक्त केले असून महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरच्या जनतेचा अंत पाहू नये, असे आवाहन केले आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील अडचणीत
टोलविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. टोलविरोधी कृती समितीत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेते व राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मात्र अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याने सतेज पाटील या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाहीत, तर दुसरीकडे जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे.