आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tour On Drought Area Means Over Agreegeration Raj Thakarey Bleam On Shard Pawar

दुष्काळी भागात दौरे म्हणजे भंपकपणाच; राज ठाकरे यांचा शरद पवारांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - ‘दुष्काळी भागातील नेत्यांचे दौरे म्हणजे भंपकपणा आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे, ते पाणी, चारा देऊ शकतात, पण त्यांना करायचे काहीच नाही, मग नुसत्या दौ-याने काय साधणार?’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह कॉँग्रेस-राष्‍ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले.

राज ठाकरे यांनी सोमवारी सांगलीत पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या, तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. ‘तुम्ही दुष्काळी भागाचा दौरा करणार काय?’ या प्रश्नावर उसळून राज म्हणाले, ‘हा भंपकपणा आहे. या दौ-या तून काहीही साध्य होत नसते. सिंचन योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, यातून किती कामे झाली? किती दुष्काळ हटला? यांच्या हाती सत्ता आहे. ठरवले तर पाणी देऊ शकतात, जनावरांना चारा देऊ शकतात; मात्र काही करायचेच नाही.’ ‘मनसेने गेल्या वर्षी राज्यभर केलेल्या टोलविरोधी आंदोलनाचे काय झाले?’ या प्रश्नावर राज यांनी ‘ महिनाभरात तुम्हाला उत्तर मिळेल’ असे सांगितले.

परप्रांतीयांचे लोंढे वाढले
राज म्हणाले की, ‘दिल्ली बलात्काराच्या घटनेपूर्वी देशात अशी घटना घडलीच नव्हती का? मात्र मीडियाने हा प्रश्न मोठा केला. अर्थात ते चांगलेच झाले; पण मूळ प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करतोय. मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने परप्रांतीयांचे लोंढे येत असतात. येथे चांगला पैसा मिळतो. मग त्यांना असले धंदे सुचणारच. यावर कोणी बोलत नाही. आम्ही आंदोलन केले की आमच्या नावाने ओरड होते.

दुष्काळाचा मुद्दा कळीचा
राज ठाकरे यांच्या राज्यभर दौ-यांचे प्रयोजन विधानसभा निवडणूक असल्याचे दिसत होते; मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. त्यानंतर दुस-या प्रश्नाच्या उत्तरात मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा असेल, असेही त्यांनी सांगितले.

आता जाग आली : काँग्रेस
राज्यात दोन वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती आहे. परंतु, ‘कृष्णकुंज’वर बसून कृष्णेच्या पाण्याची खोली तपासणा-यांना आता जाग आलेली दिसते. भंपक दौरे आणि भंपक घोषणा कोण करतात, याची राज्याला पुरेपूर जाणीव आहे, अशा शब्दात कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीकेला उत्तर दिले.