आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण म्हणतं स्वभावाला औषध नसते... कोल्हापुरात उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘काय करणार? स्वभावाला औषध नसतेे...!’ चिडखोर किंवा हेकट व्यक्तींबद्दल घरोघर ऐकू येणाऱ्या या प्रतिक्रिया आगामी काळात मात्र हळूहळू कमी होतील. कारण, मानवी स्वभावात बदल करण्याचा उपाय आता सापडला आहे.
मानवी मेंदूमधील काही पेशी नष्ट करून स्वभाव बदलता येतो, असे काही वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते तर त्याला अनेकांनी वेड्यात काढले असते. कोल्हापुरातील विन्स हास्पिटलचे चेअरमन डाॅ. संतोष प्रभू यांनी मात्र हे कसे शक्य आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे. राग अनावर होणाऱ्या देश-विदेशातील ८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रभू यांनी आपले मेंदूवरील प्रभूत्व सिद्ध केले आहे.

महाराष्ट्रातील एक विख्यात न्यूरो सर्जन म्हणून डॉ. प्रभू यांची ख्याती आहे. देश -विदेशात मार्गदर्शनासाठी जाणाऱ्या संतोष प्रभू यांनी आपल्या कोल्हापुरातील जुन्या प्रभू हास्पिटलमध्ये २००२ पासून न्यूरो नेव्हिगेशन यंत्रणेच्या साह्याने कंपवात थांबवण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यास सुरुवात केली. मेंदूमधील ज्या पेशींमुळे कंपवात होतो त्याच पेशी नष्ट करणारी ही शस्त्रक्रिया आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक कंपवाताच्या रुग्णांना त्यांनी बरे केले आहे. फिट्स येणाऱ्या रुग्णांवरही त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. यातूनच न्यूरो नेव्हिगेशन यंत्रणेच्या माध्यमातून मेंदूवरील कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात ते तरबेज झाले. मानसिक किंवा भावनिक रोगाबाबत मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जगभरात केवळ सहा ते सात ठिकाणीच केल्या जातात. त्या प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. यात डॉ. प्रभू यांचे नाव आता आघाडीवर आहे.

न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान आहे काय? : जीपीएसच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा ठावठिकाणा जसा शोधला जातो त्याच पद्धतीने मेंदूवरील शस्त्रक्रियेवेळी न्यूरो नेव्हिगेशन यंत्रणा काम करत असते. या मेंदूवरील शस्त्रक्रियेआधी आपरेशन थिएटरमध्ये लावलेले तीन कॅमेरे व रुग्णाच्या डोक्याला लावलेला ट्रॅकर एकमेकाला संदेश वहन करत असतात. या काळात डोके हलू नये म्हणून स्क्रूच्या माध्यमातून फिट केले जाते. यानंतर रुग्णाच्या डोळ्याजवळील, कपाळाच्या मध्यमागी तसेच कानाजवळील काही पॉईंट फिक्स केले जातात आणि मेंदूमधील नेमक्या कोणत्या भागामध्ये कोणत्या पेशी नष्ट करायच्या आहेत हे निश्चित केले जाते. हे सर्व स्क्रीनवर दिसू शकते. यानंतर कवटीला छिद्र पाडून एक सुई आत घातली जाते. ही सुई अगदी अचूकपणे निश्चित ठिकाणी नेण्यासाठी मदत करणारी ही यंत्रणा म्हणजेच न्युरोनव्हीगेशन यंत्रणा होय.

इंग्लडचा जॉन थेट कोल्हापुरात : राग अनावर होण्याच्या आणि चिंता, भीती यामुळं त्रासलेला जॉन कॅलीव्हर हा ३० वर्षाचा तरुण इंग्लंडमध्ये उपचार न झाल्याने गेल्यावर्षी थेट कोल्हापुरात आला. विन्समध्ये त्याच्यावर जुलै २०१४ मध्ये राग निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यानंतर चिंता निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी भीती निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करण्याची शस्त्रक्रिया त्याच्यावर करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम या तरुणावर दिसू लागला आहे.

फीटस्, कंपवात, चेहऱ्यावरील वेदना, अवयवाचे आखडलेपण संपणार : फीटस्, कंपवात, चेहऱ्यावरील वेदना, आखडलेले अवयव यावरही या प्रकारच्या शस्त्रक्रियेने उपचार होवू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे कॅन्सरच्या रुग्णाला होणाऱ्या असह्य वेदनाही अशा पध्दतीच्या शस्त्रक्रियेने बंद करता येत असल्याचा डॉ. प्रभू यांचा दावा आहे.

राग अनावर होतोय...
काही वर्षांपूर्वी मेंदूतील रचनेचा सूक्ष्म अभ्यास करून राग अनावर का होतो, याचा अभ्यास डॉ. प्रभू यांनी केला. मग राग अनावर करणाऱ्या या पेशीच नष्ट केल्या तर? तशी शस्त्रक्रियाही त्यांनी यशस्वी केली. आतापर्यंत त्यांनी ८ रुग्णांवर अशा यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

चिंता-भयमुक्ती
राग अनावर होणे शस्त्रक्रियेमुळे कमी करता येते तशीच आता चिंता निर्माण करणाऱ्या पेशी आणि सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर मनात भय निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट करण्याचीही शस्त्रक्रिया नुकतीच केली. याच्या अचूकतेचे मोजमाप लवकरच कळेल.

जागे ठेवून केली जाते शस्त्रक्रिया
अशा शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला जागेच ठेवावे लागते. कारण मेंदूतील ठरलेल्या ठिकाणापेक्षा अन्यत्र सुई अर्धा मिमी जरी सरकली तर रुग्णाची वाचा, श्रवण किंवा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. ही सुई एका मिमीच्या दहाव्या भागापर्यंतचे आपले लक्ष्य साध्य करू शकते. सुई अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यात वीजप्रवाह सोडले जातात. सुई योग्य दिशेने न गेल्यास त्याचा परिणाम रुग्णाच्या काही अवयवांवर दिसतो. सुईची दिशा बदलता येते. म्हणूनच शस्त्रक्रियेवेळी रुग्णाशी सातत्याने संवाद साधावा लागतो.