आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळ्यांसाठी टवाळक्या करू नका : उदयनराजेंनी नाव न घेता अामदार जितेंद्र अाव्हाडांना फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ‘कोणत्याही व्यासपीठावरून अथवा विचार मंचावरून संभाजीराव भिडे गुरुजी यांचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा एकेरी उल्लेख करणे आणि पराचा कावळा करून एखाद्याला दंगलखोर म्हणून घोषित करणे बेकायदेशीर अाहे. सामाजिक एकोपा बिघडवणारे असे प्रकार यापुढे सहन करणार नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी अापल्या पक्षाचे अामदार जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्षपणे फटकारले. तसेच टाळ्या मिळवण्यासाठी टवाळक्या करू नका, असा सल्लाही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला.

सांगलीतील शिवसन्मान परिषदेत अाव्हाड यांनी भिडे गुरुजींवर केलेल्या अाराेपावरून सध्या अाराेप-प्रत्याराेप सुरू अाहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले, ‘सांगली येथील दंगलीची घटना माणुसकीला धरून नाहीच. त्या दंगलीचा सूत्रधार कोण याबाबत पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांनी शोध व निष्कर्ष काढणे अपेक्षित आहे.

पुराव्याअभावी किंवा सुतावरून स्वर्ग गाठून, मागचे संदर्भ न लावता कोणाचा तरी दंगलखोर म्हणून उल्लेख करणे हे टाळ्या मिळवण्यासाठी टवाळकी केल्यासारखे आहे. हा प्रकार बेकायदेशीर आहे. ताे आम्ही सहन करणार नाही. कोणत्याही संघटनेने आपल्या उद्दिष्टांचा प्रचार, प्रसार, जाहिराती जरूर कराव्यात; मात्र दुसऱ्या संघटनेवर बेछूट आरोप करणे, एखाद्या जातीधर्माचा अनादर करणे या बाबी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. अशाच संघटनांना समाजात स्थान राहील,’ असेही खासदार भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.