आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही बाळासाहेबांना फोन करावासा वाटतो; उद्धव ठाकरे भावनाविवश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांना हा धागा पकडून त्यांच्या अनुभवाविषयी विचारणा होते. कोल्हापुरातही तसेच झाले. मात्र, या प्रश्नावर उद्धव ठाकरे भावनाविवश झाले. ‘आजही सभा गाजली की, बाळासाहेबांना फोन करण्यासाठी हात उचलतो’ एवढे बोलून ते शांत झाले आणि वातावरणच बदलले.

खासदार राजकुमार धूत, दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, आमदार चंद्रकांतदादा पाटील, संजय मंडलिक या वेळी उपस्थित होते.

कोल्हापुरात रामदेवबाबा आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांबाबतचा प्रश्न नेहमी विचारला जातो. मग पुन्हा सगळ्या आठवणी दाटून येतात, पण आजही एखादी जंगी सभा यशस्वी झाली की ते सांगण्यासाठी बाळासाहेबांना फोन करण्यासाठी हात उचलतो, असे बोलून उद्धव काही वेळ शांत बसले. त्यानंतर काही वेळ इतरही कोणी बोलले नाही.

मनसेच्या विषयावर पडदा पडल्याचे सांगत मोदींच्या नावावर मत मागण्याचा आरोप करणार्‍या शरद पवारांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. केंद्रामध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर गारपीटग्रस्तांवर असणारे सर्व कर्ज आपण माफ करून घेणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

रामदेवबाबा आशेचा किरण
हिंदुत्वाबाबत बोलायला या देशात कचरणारे अनेकजण आहेत. मात्र, रामदेवबाबा हे केवळ हिंदुत्वाबाबत बोलत नाहीत, तर ते आमच्याही दोन पावले पुढे लढण्यासाठी या मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच ते आमच्याबाबत आशेचा एक किरण आहेत, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी या वेळी काढले.

काँग्रेस 50च्या आत
रामदेवबाबा यांनी काँग्रेसला 50 जागाही मिळणार नसल्याचे भाकीत केले. देशामध्ये सत्तापरिवर्तन झाले पाहिजे या विचारातून देश वाचवण्यासाठी आम्ही मैदानामध्ये उतरल्याचे सांगतानाच बाबांनी काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा ठासून मांडला. ‘केजरीवाल तो पल्टुराम हो गया’ अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. निवडणुकीनंतर सोनिया इटली आणि उरलेले काँग्रेस नेते तुरुंगात असतील, अशी यांची कामगिरी असल्याचे ते म्हणाले.

शिष्य सोडून अडसुळांना मदत
देशासाठी आम्ही विचाराने काम करत असल्याने राणा यांच्यासारखे पट्टशिष्य असतानाही अमरावतीत आम्ही आनंदराव अडसूळ यांच्या पाठीशी राहिलो आणि ते मोठय़ा फरकाने विजयी होतील, असा विश्वासही या वेळी रामदेवबाबा यांनी व्यक्त केला.