आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील जनताच आता सरकार बदलेल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉँग्रेसने मुख्यमंत्री बदलला काय किंवा नाही काय, या सरकारलाच बदलायचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतला असल्याचा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कोल्हापुरात येणारे जावडेकर हे पहिलेच केंद्रीय मंत्री. रविवारी सकाळीच त्यांनी येथील महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यानंतर वन, पर्यावरण विभागाच्या अधिकार्‍यांची बैठकही घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून काम करतील, असे सांगितले. लोकांनी देशात सुशासन आणण्यासाठी सत्ताबदल केला असून त्या दृष्टीने आता पारदर्शी कारभार करण्याची सुरुवात झाली आहे.
‘देशाच्या संरक्षणामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जे प्रस्ताव वन विभागाकडे पडून होते त्यांना तातडीने मंजुरी दिली आहे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि घनकचरा याकडे बारकाईने लक्ष देऊन उपाययोजना करणार आहोत. पश्चिम घाटाशी संबंधित मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच वन व पर्यावरणमंत्र्यांची बैठक घेणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

कारवारजवळ नाविक तळ
50 युद्धनौका, 10 पाणबुड्या आणि नौदलासाठी आवश्यक नाविक तळ कारवारजवळ उभारण्यासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आल्याची माहिती या वेळी जावडेकर यांनी दिली. या ठिकाणी नेव्ही नगरही उभारण्यात येणार आहे. याआधीच्या सरकारने तीन वर्षे या प्रस्तावावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, आमच्या सरकारने 30 मिनिटे चर्चा करून 3 मिनिटांत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आकाशवाणी केंद्रे एफएम करणार
मध्यम लहरीच्या आकाशवाणी केंद्रांची क्षमता आता अपुरी पडत असल्याने ती नीट ऐकू येत नाहीत. त्यामुळे आकाशवाणीची केंदे्र एफएम करणार आहोत. एफएम व कम्युनिटी रेडिओला प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यासाठीचे लिलाव लवकरच केले जातील. दूरदर्शन लोकप्रिय करण्याबरोबरच गरज पडल्यास आणखी काही वाहिन्या वाढवण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.