आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Grants Commission Canceled The Agreement Karnataka Open University

चित्रकलेचा कानडी मुक्त बाजार विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - विद्यापीठ अनुदान आयोगाने कर्नाटक मुक्त विद्यापीठाची मान्यता रद्द केल्याने या विद्यापीठाने देशभर मांडलेला शिक्षणाचा बाजार उठला खरा; पण सन २०१३ नंतर विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याबरोबरच या विद्यापीठाचे दूरशिक्षणाचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक केंद्रांचे कोट्यवधी रुपयेही अडकले आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने म्हैसूर येथून चालत असलेल्या कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेविषयी शंका घेतल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने सन २०११ मध्ये कर्नाटक मुक्त विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, शिवाय विद्यार्थ्यांनाही सावध केले होते. मात्र त्यानंतरही कर्नाटक मुक्त विद्यापीठाने त्यामध्ये कोणतीही सुधारणा न करता आपले अभ्यासक्रम सुरूच ठेवले. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनीही या विद्यापीठात प्रवेश घेतले हाेते. दरम्यान, याची गांभीर्याने दखल घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१२- १३ या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाच्या सर्व
दुरुस्त अभ्यासक्रमांची मान्यताच रद्द केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील चित्रकला, फूड टेक्नॉलॉजी, अनिमेशनमध्ये या विद्यापीठाची पदवी घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
पुणे, नाशिक, अाैरंगाबादेतही केंद्र
कर्नाटक मुक्त विद्यापीठाची महाराष्ट्रात चित्रकलेची सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, औरंगाबाद, अमरावती, नाशिक येथे केंद्रे आहेत. शिवाय कर्नाटकातील धारवाड येथेही महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने हा अभ्यासक्रमच रद्द केल्याने औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली येथील केंद्रे बंद झाली; मात्र पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय, सातारा येथील केंद्र अद्यापही सुरू आहे.
काेणत्याही निकषाविनाच खुला प्रवेश
महाराष्ट्रात किंवा कोठेही बहि:स्थ पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना संबंधित विद्यार्थ्याने आधी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, विद्यापीठ बदलत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट (स्थलांतर दाखला), अनुभवाचा दाखला हा विद्यार्थ्याला सादर करावाच लागतो. तसे विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र कर्नाटक मुक्त विद्यापीठाने यापैकी कोणतेही निकष पाळले नाहीत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दहावी पास-नापासांनाही प्रवेश दिल्याची उदाहरणे आहेत.
विद्यार्थी, केंद्रचालकांचे माैन राज्यातील काही केंद्रचालक व विद्यार्थ्यांची यात फसगत झाली असली तरी अजूनही काेणी उघडपणे याविषयी बाेलण्यास तयार नाही. काही विद्यार्थ्यांनी व केंद्र चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’कडे या विद्यापीठाचा भंडाफाेड केला अाहे.
पदवीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा
चित्रकलेच्या दोन वर्षांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याकडून वर्षाला १५ हजार रुपये फी घेतली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १० हजार रुपये शोधनिबंधासाठी अतिरिक्त घेतले जातात. असे एका विद्यार्थ्याचे दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ७० हजार रुपये या विद्यापीठाने घेतले. त्याबदल्यात त्यांना साधी पुस्तकेही दिली नाहीत. उलट पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा भाग असलेला शोधनिबंध सादर करताना जुन्याच विद्यार्थ्यांचे थिसीस झेरॉक्स करून सादर करा, असे अभ्यासकेंद्रांशी समन्वय साधणारे सांगतात, त्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळले गेले. महाराष्ट्रात केंद्र सुरू करण्यासाठी एका अभ्यासक्रमाला केंद्र चालकांकडून ५५ हजार रुपये विद्यापीठाने घेतले आहेत. औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील केंद्र सुरू होण्याआधीच विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठाची मान्यता रद्द केल्याने केंद्रचालकांचे ५५ हजार रुपये अडकले आहेत. विद्यापीठ ते परत करण्यासही नकार देत आहे.