आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडिगांची रझाकारी! येळ्ळुरात मराठी भाषकांवर पोलिसांचा घरात घुसून हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक दुसर्‍यांदा उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईला विरोध केल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषकांवर रविवारी लाठ्याकाठ्यांनी अमानुष हल्ला चढवला. पुरुषांबरोबरच महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांनी जबर मारहाण केली. घरात घुसून ज्येष्ठ नागरिक, तरुणांवर दंडुके चालवण्यात आले. अनेकांना रस्त्यावरून फरफटत नेत महिलांनाही तुडवून मारण्यास पोलिसांनी मागे पाहिले नाही. या घटनेत 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आपले पैसे व मोबाइलही हिसकावून घेतले असल्याचे अनेकांनी सांगितले. बेळगाव, खानापूर तालुका व निपाणीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या भागात सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे.
मराठी अस्मितेची मुस्कटदाबी
शुक्रवार : फलक पाडला
बेळगावपासून 7 किलोमीटर अंतरावर येळ्ळूर गावच्या वेशीवर गेल्या 56 वर्षांपासून ‘महाराष्ट्र राज्य येळळूर’ असा फलक आहे. कन्नडिगांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत शुक्रवारी सकाळी तो पाडण्यात आला.
शनिवार : पुन्हा उभारला
ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांना न जुमानता पुन्हा एकवार नव्याने फलक उभारला. या वेळी रस्त्यावर झाडे तोडून टाकून रस्ते रोखून धरण्यात आले होते. यावरून संतप्त झालेल्या कर्नाटक प्रशासनाने ग्रामस्थांचा बदला घेण्याचाच निश्चय केला.
रविवार : फलक पुन्हा उद्ध्वस्त, मारहाण
सकाळी दीड हजारावर पोलिस येळ्ळूरमध्ये दाखल झाले. नव्याने उभारण्यात आलेला फलक साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केला. यानंतर गावभर पोलिसांच्या अरेरावीला सुरुवात झाली.
ही मराठी जनांच्या हक्काची पायमल्ली : मुख्यमंत्री चव्हाण
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्याशी बोलून लाठीमाराचा तीव्र निषेध केला. ही मारहाण अल्पसंख्य मराठी भाषकांच्या घटनादत्त हक्काची पायमल्ली आहे. सीमा प्रश्नावर संयम बाळगणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय पाळणे मान्य केले असतांना कर्नाटकने कठोर कारवाई करणे बरोबर नाही, असे ते म्हणाले.
बाळाच्या अंगावर काचांचा खच
एक कुटुंबीय घराचे दार बंद करून बसले होते. यातील दोन महिन्यांच्या बाळाला आंघोळ घालून झोपवण्यात आले होते. खिडक्यांच्या काचा फोडताना पोलिसांनी जराही विवेक बाळगला नाही. या बाळांच्या अंगावर काचांचा खच पडला.
पोलिस अधीक्षकांचे ठाण
बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. चंद्रगुप्त हे स्वत: दिवसभर येळ्ळूर येथे ठाण मांडून होते. सरकारने राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख हेमंत निंबाळकर यांना धाडले आहे.

याचिकेवर आज सुनावणी
कर्नाटकातील आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी फलकाविरुद्ध जूनमध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. आता 28 जुलैला याचिकेवर सुनावणी होणार आहे.