आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villages Near Karnataka Border Wants To Leave Maharashtra

सीमा भागातील तहानलेली 44 गावे कर्नाटकच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- ‘महाराष्ट्राचा आम्हाला अभिमानच आहे; पण पोटाला अभिमानाची भाषा कळत नाही. सांगली जिल्ह्याला चार-चार मंत्री लाभले, त्यांनी आपापल्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठीच काम केले. मात्र, तीन वर्षे आम्ही दुष्काळात होरपळतो आहोत, आम्हाला विचारायलाही कोणी आले नाही. याच्या नेमकी उलटी स्थिती कर्नाटकात आहे. आम्ही जर कर्नाटकात गेलो तर आमच्या एका गावाचाच नव्हे, तर सीमा भागातील सर्व 44 गावांचा दुष्काळ कायमचा हटेल. ‘महाराष्ट्र नल्ली येक इरवदू?’ अर्थात आम्ही कर्नाटकात का जाऊ नये? सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी गावचे माजी सरपंच अप्पासाहेब नामद यांचा हा सवाल.

सलग तीन वर्षे पावसाने दडी मारल्याने जतच्या सीमा भागातील 44 गावांनी कर्नाटकात जाण्याची पुन्हा एकदा मागणी जोर धरत आहे. वास्तविक 1960 मध्येच सीमाप्रश्नाबाबत नेमलेल्या महाजन आयोगाने सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील 247 गावे कर्नाटकला द्यावीत, अशी शिफारस केली होती. त्यात या 44 गावांचा समावेश होता. फरक एवढाच होता, त्या वेळी निकष होता भाषेचा आणि आज वास्तव आहे ते जगण्याचे.
या 44 गावांपैकीच एक असलेले उमराणी.

हे गाव तसे संस्थानिकांचे. तसेच शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी पन्हाळ्यावर स्वारीसाठी निघालेल्या आदिलशहाच्या सैन्याला रोखून धरले ते इथेच. शिवकाळातही इथे पाण्याची भ्रांत होतीच. गावाजवळून गेलेल्या बोर नदीच्या एका डोहात पाणी शिल्लक होते. त्यावर शत्रू सैन्य काही काळ तग धरून होते; मात्र पाणी संपत आल्यावर प्रतापरावांनी गनिमी काव्याने 7 सैनिकांच्या साथीने आदिलशहाच्या सैन्याला शरण यायला भाग पाडले.

येथील डफळे सरकार हे संस्थानिक. स्व. विजयसिंहराजे डफळे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना 2002 मध्ये गावासाठी राज्यातील एकमेव असा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित तलाव बांधला. पाऊस पडल्यानंतर या तलावात पहिल्या वर्षी पाणीसाठाही झाला; मात्र तलावाला गळती आहे. ती काढण्याचा जर्मन तंत्रज्ञांनी बराच प्रयत्न केला; मात्र ती अद्याप निघालेली नाही.
चारही बाजंूनी टेकड्या आणि द-या असल्याने गावाला मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र लाभले आहे; मात्र त्याचा हिवरे बाजारप्रमाणे उपयोग करून घेण्यात गाव कमी पडले.
जर्मन तलावाला लागलेली गळती काढण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी गावच्या पुढा-यांनी पाठपुरावा केला नाही.
जर्मन तलावाशिवाय गावाला आणखी चार तलाव आहेत; मात्र त्यातही गाळ साचलेला असल्याने पावसाळ्यात फारसे पाणी साचून राहत नाही.
शंभर टक्के गाव कन्नड भाषिक. सोबत एक दुभाषी मित्र घेतला. अप्पासाहेब नामद यांना थोडेफार मराठी येत होते. ते सांगत होते, ‘‘गावात पूर्वी पानमळे होते, मात्र दुष्काळाच्या चटक्यात ते करपून गेले. त्यानंतर लोकांनी कमी पाण्यावर येणारे द्राक्ष घ्यायला सुरुवात केली. गावाला असलेल्या पाच तलावांनी आजवर द्राक्षबागा जगवल्या, पण यावर्षीच्या दुष्काळाने त्याही संपण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात चार-चार मंत्री आहेत. त्यांनी कधीही आमच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत. त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघापुरताच विचार केला. आमच्या गावाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार आहे; मात्र वीस वर्षांत अद्याप कॅनॉलच्या खोदाईला सुरुवातही झाली नाही.
याउलट कर्नाटकचे सरकार आहे. ते सरकार शेतक-यांचे सरकार आहे. शेतीच्या मशागतीच्या अवजारांपासून बियाणे, पाणीपुरवठा या सा-यांसाठी तिकडे अनुदान मिळते. पाऊस पडला नाही तर कर्जे माफ केली जातात. आमच्या गावाच्या सीमेपासून 4 कि.मी. अंतरावरून कर्नाटकातील हिप्परगी धरणाचा कालवा गेला आहे. तिकडे हिरवीगार शेते आणि आमच्याकडे उजाड माळरान.
कर्नाटकात गेलो तर हिप्परगीच्या कालव्यातून आमच्या गावाजवळ उगम पावणा-या बोर नदीत कॅनॉलद्वारे पाणी सोडणे शक्य आहे. बोर नदीत पाणी सोडले की नैसर्गिक उताराने सीमेवरच्या सर्व 44 गावांत ते पोहोचेल आणि या भागातील दुष्काळ कायमचा हटेल. मग आम्ही कर्नाटकात जावे, असे लोकांना का वाटू नये?

4 कि.मी.वरून पाणी आणणे सोपे की 100 ?
महाराष्ट्र सरकारची जत तालुक्याच्या सीमा भागातील 10 ते 15 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याची योजना आहे. म्हैसाळ ते जत हे अंतर 100 कि.मी.हून अधिक आहे. त्यासाठी येणारा खर्चही प्रचंड आहे. एवढे करूनही सीमा भागातील सर्व गावांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्याऐवजी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील हिप्परगी धरणातून पाणी घेऊन बोर नदीत सोडल्यास अत्यल्प खर्चात सर्व गावांना पाणी देणे शक्य होणार आहे.