आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaykumar Pathare Success Story Read More At Divya Marathi

व्हीआयपी होजिअरीच्या जयकुमार पाठारेंनी नोकरी सोडून उभारला २५० कोटींचा व्यवसाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - वीज खात्यातील सरकारी नोकरी सोडून काही तरी वेगळं करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी वीज खात्यातील कंत्राटे घ्यायला सुरुवात केली. मात्र, प्रत्येकाला उपयुक्त ठरेल असं वेगळं उत्पादन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आज होजिअरीमध्ये व्हीआयपी बँड विदेशातही मान्यता पावला आहे.
२५० कोटींचा व्यवसाय उभारणारे जयकुमार पाठारे ‘दिव्य मराठी’शी बोलत होते आणि कोल्हापूरसारख्या त्या काळच्या निमशहरी भागातून बाहेर पडून मुंबईतील यशस्वी उद्योजक बनलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास उलगडत गेला.
सर्वसाधारण कुटुंबात कोल्हापुरात जन्म. तिसरीत असताना वडिलांचे निधन. आईने तिन्ही मुलांना वाढवले. यातील जयकुमार यांना पहिल्यापासून खेळाची आवड. शाळेत क्रिकेटमध्ये संधी दिली नाही म्हणून कॅरमपासून टेनिसमध्येही कौशल्य प्राप्त. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये संघ निवडीत अन्याय झाल्याने सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश आणि राजाराम संघाचा पराभव. सोलापुरातील मावशीच्या नवऱ्याला त्यांच्या लाउडस्पीकरच्या व्यवसायात मदत करणारे पाठारे पुन्हा कोल्हापुरात येतात. विद्युत मंडळात नोकरीला लागतात.
वीज खात्यातील १८० रुपयांची नोकरी सोडून अंबरनाथला २५०० रुपयांच्या नोकरीवर रुजू; परंतु वीज खात्यातील अनुभव कामाला आला आणि मे. जे. के. पाठारे कंपनीची स्थापना झाली. अनेक कंत्राटे घेतली गेली. नंतर पाटर्नर घेऊन मॅक्सवेल इलेक्ट्रिकल कंपनीची स्थापना केली आणि ११ वर्षे काम केले आणि पुन्हा नवीन काही करण्याच्या जिद्दीने होजिअरी व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

वडाळ्याला दोन गाळ्यांत छोटी फॅक्ट्री सुरू केली. सुरुवातीला लेडीज स्लॅक्स व नायलॉन पँटीज आणि नंतर पुरुषांच्या अंडरवेअर्स बनवायला सुरुवात केली. या व्यवसायातील माहिती नसताना धाडस करून तत्कालीन व्हिक्टर, कोझी, डॉन, आर. आर. या कंपन्यांशी टक्कर दिली. सुरुवातीला दिल्ली, नंतर उत्तर भारतात आणि मग महाराष्ट्रात व्हीआयपीचा बँ्रड लोकप्रिय ठरला.
२४ संस्थांवर पदाधिकारी

मुंबई, अंबरनाथपासून कोल्हापूरपर्यंतच्या २४ संस्थांवर पाठारे पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यातील १० पेक्षा अधिक संस्थांमध्ये ते प्रत्यक्षपणे सक्रिय आहेत. त्यांचा कार्यभार वाढतच आहे. त्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच त्यांचे पाठबळ राहिले आहे.
भारतात कारखाने, विदेशात निर्यात

अंधेरी, डोंबिवली, गोबीचेट्टापल्यम, गुजरातमधील अंबरगाव, तामिळनाडूतील थिंगलूर, पेरू दुराई, दमण या ठिकाणी वेगवेगळे कारखाने सुरू आहेत. युरोपमध्ये व्हीआयपी ब्रँडला मोठी मागणी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना अमेरिका आणि जपान येथूनही नवनवीन ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली आहे.
पंचाहत्तरीतही लाँड्री व्यवसायाची सुरुवात

वयाच्या ७५ नंतरही हा माणूस स्वस्थ बसलेला नाही. तीन वर्षे शेती आणि दुग्ध व्यवसायात त्यांनी काम केले. अनेक जातीचे आंबे, शेवगा, कडुलिंब, आवळा याची लागवड करून उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. गाई, म्हशी पाळल्या. याच काळात डोंबिवलीत जेटक्लीन या नावाने लाँड्री सुरू केली. ही महाराष्ट्रातील उत्कृष्ट लाँड्री होईल, असा त्यांना विश्वास आहे.
दुसऱ्याला पटवणं हे यशाचं गमक
सचोटी, शत्रूचेदेखील कधी वाईट न चिंतणं, फळाची आशा न धरता काम करणं, नवीन गोष्टी शिकणं आणि आपलं म्हणणं दुसऱ्याला शिताफीने पटवून देणं यातच आपल्या यशाचं गमक दडलं आहे, असे पाठारेंनी सांगितले.‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.