आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कारणांमुळे पाणी एक्स्प्रेसला झाला विलंब, आज रात्री पोहोचणार रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरज रेल्वे स्थानकावर वॅगन्समध्ये पाणी भरताना. - Divya Marathi
मिरज रेल्वे स्थानकावर वॅगन्समध्ये पाणी भरताना.
सांगली - तहानलेल्या लातूरकरांची तहान भागवण्यासाठी १० वॅगनची पहिली पाणी एक्स्प्रेस साेमवारी रात्री लातूरला पोहाेचत आहे. रविवारी ५० वॅगनची पाणी एक्स्प्रेस मिरजेत दाखल झाली. चाचणीसाठी यापैकी केवळ १० वॅगन साेमवारी पहिल्या फेरीत लातूरला येतील. प्रत्येकी ५० हजार लिटरप्रमाणे या सुमारे ५ लाख लिटरची पहिली खेप पाेहाेचेल.

दरम्यान, या वॅगनमध्ये पाणी भरण्यासाठी मिरजेत स्वतंत्र पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू अाहे. यासाठी ५ दिवस लागतील. त्यानंतर १७ तारखेच्या आसपास उर्वरित ४० वॅगन लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून लातूरला रेल्वेने पाणी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात अाला.
त्यानुसार राजस्थानातील कोटा येथून ५० वॅगनची विशेष रेल्वे रविवारी पहाटे मिरजेत अाली. प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर याप्रमाणे २५ लाख लिटर पाणी घेऊन ही रेल्वे लातूरला जात आहे. मात्र ५० वॅगनमध्ये पाणी भरण्यासाठी ७० तास लागतील. शिवाय त्यासाठी एक मार्ग पूर्णपणे रिकामा ठेवावा लागणार आहे. या पर्यायाची रविवारी दुपारी चाचणी घेण्यात आली.
पाणी एक्सप्रेसवर काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस....
लातूरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. लवकरच मिरजेहून लातूरला पाणी एक्सप्रेसच्या माध्यमातून वॅगन्स पाठविल्या जातील. अशा 50 वॅगन्स मिरजेला पोहोचल्या आहेत. त्यात सध्या पाणी भरण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पाणी देण्यावर आम्ही सध्या भर देतोय.
या 5 कारणांमुळे पाणी एक्स्प्रेसला झाला विलंब
१) दुष्काळाकडे दुर्लक्ष
गेल्या वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रालाही कमी पावसाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा कडक असेल, पाणी टंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल असे भाकीत व्यक्त करण्यात येत होते. तरीही सरकारने त्यावर वेळीच तोडगा काढला नाही. उलट पारंपरिक पाणी पुरवठ्यावर भर दिला. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले.
२) प्रशासनाचे ढिसाळ नियोजन
दुष्काळाची चाहुल लागली असतानाही राज्य सरकार राजकारणात दंग होते. प्रशासनाचा कारभार ढिसाळ होता. विरोधी पक्षांनी चारा छावण्या आणि दुष्काळावरुन टार्गेट केल्यानंतर सरकारला जाग आली. सरकारने प्रशासनाला कामी लावले. तोवर दुष्काळग्रस्त भागांना मात्र भीषण पाणी संकटाला तोंड दिले. अजूनही काही भागांमध्ये पाणी संकट गंभीर आहे. त्याला युद्धजन्य स्थिती प्राप्त झाली आहे.
३) उन्हाळ्यापूर्वी रेल्वेशी बोलणी नाही
लातूरसारख्या जिल्ह्यांना रेल्वेने पाणी पुरवठा केला जाईल, अशी पोकळ आश्वासने जाहीररीत्या दिली जात होती. पण त्यामागे कोणतेही नियोजन दिसून आले नाही. ऐन दुष्काळात रेल्वेशी बोलणी करुन वॅगन्स तयार करण्यात आल्या. मिरजेच्या रेल्वेस्थानकावर आणण्यात आल्या. उन्हाळ्यापूर्वीच याची पूर्वतयारी केली असती तर लातूरकरांसह इतर जिल्ह्यांनाही याचा फटका बसला नसता.
४) मिरज रेल्वेस्थानकावर प्रचंड गैरसोय
सध्या 50 रेल्वे टॅंकर्स मिरज रेल्वे स्थानकावर आणण्यात आले आहेत. पण येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर केवळ 10 टॅंकर्स उभे राहू शकतात. त्यामुळे दहा-दहा टॅंकर्स अशी विभागणी करण्यात आली आहे. तसेच रेल्वेची पाणी भरण्याची यंत्रणा कमी क्षमतेची आहे. त्यामुळे एक वॅगन भरण्यासाठी सुमारे साडेचार तासांचा अवधी लागतो. यावर तोडगा म्हणून स्वतंत्र पाईप लाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याला काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
५) लातूरमधील पाणी वाटणी
लातूरमध्ये पाणी आल्यावर रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या देशमुख यांच्या विहिरीत साठवले जाणार आहे. त्यातून पाणी वाटप केले जाणार आहे. पण प्रत्यक्षात त्याचे नियोजन सरकारने केलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे. आमच्या घरी पाणी कसे येईल असे नागरिक विचारत आहेत.

तातडीचे प्रयत्न
‘पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत पाणी पाठवता येईल का, यासाठी चाचणी घेतली. सध्या दहा वॅगन साेमवारी पाठवत आहोत.’ - मकरंद देशपांडे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य (यांनीच पाठवला हाेता पहिला प्रस्ताव)
यामुळे उद्भवले पाणी संकट
लातूरमध्ये एकूण 13 साखर कारखाने आहेत. या शिवाय या भागातील इंडस्ट्रीयल एरिया मोठा आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा करावा लागतो. वेळीच नियोजन न केल्याने लातूरमध्ये पाणी संकट उद्भवले आहे. प्रशासनाने पाण्याची उपलब्धता आणि उन्हाळ्यातील पाण्याची मागणी याची सांगड घातली असती तर लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली नसती. उन्हाळ्याच्या तोंडावर प्रशासनाला जाग आली आहे. त्याचा फटका स्थानिक लोकांना बसला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा....राजस्थानच्या कोटा येथे वाफेने स्वच्छ केले टॅंकर्स....एक टॅंकर भरायला लागताहेत साडेचार तास...टॅंकर भरण्यासाठी स्वतंत्र पाईल लाईनची खोदाई सुरु....