आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Well Response Of Bandh Against Toll Collection In Kolhapur

कोल्हापूरात टो‍लविरोधी पुकारण्‍यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रति‍साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘आयआरबी’ कंपनीने पुन्हा सुरू केलेली टोलवसुली, पोलिसांनी महिला महापौरांसह नगरसेवकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कृती समितीने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी टोलबंदीसाठी शहरातील 82 नगरसेवकांनी राजीनामे दिले होते, त्यापाठोपाठ दुस-या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष व सर्व सदस्यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे दिले. दरम्यान, गुरुवारी शहरातील टोलवसुलीही सुरूच होती.
मंत्र्यांच्या घोषणेनंतरही बुधवारी पुन्हा वसुली सुरू केल्याने सर्वच नगरसेवकांनी महापौर सुनीता राऊत यांच्याकडे राजीनामे सादर केले होते. तसेच राऊत यांच्यासह नगरसेवकांनी टोलनाक्याकडे धाव घेऊन वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात महापौर जखमी झाल्या होत्या. गुरुवारी पुकारलेल्या बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या कर्मचा-यांनीही कामबंद आंदोलन पुकारल्याने शहर वाहतूक, रिक्षाही बंद होत्या, त्याचा प्रवाशांना फटका बसला. सायंकाळपर्यंत सर्व व्यवहार बंद होते. शाळांनाही अघोषित सुटी असल्याचेच वातावरण होते.
दरम्यान, शहरातील सर्व नाक्यांवर पोलिस बंदोबस्तात टोल वसुली सुरू होती. तर बुधवारी लाठीमार झालाच नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले.
शासनाची अंत्ययात्रा
शिवसेना-भाजपतर्फे सकाळी शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीही सकाळीच रंकाळा तलावाच्या पाण्यात उतरून टोल रद्दसाठी अनोखे आंदोलन केले.
कामाचे फेरमूल्यांकन करा : मुख्यमंत्री
‘आयआरबी’ला रस्ते बांधणीचे पैसे देण्यासाठी सर्वात आधी या प्रकल्पाचा नेमका खर्च किती झाला याचे 15 दिवसांत फेरमूल्यांकन करा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यासाठी पाच जणांची समिती नेमली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीम यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले.
टोलप्रकरणी खंडपीठाची केंद्र, राज्याला नोटीस
टोलबूथसंदर्भात निश्चित धोरण का नाही, अशी विचारणा करीत नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, राष्‍ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीचे सरपंच आशा खंडाले यांनी याचिका दाखल केली आहे. पाटणसांवगीजवळ टोल नाका उभारण्यात येत आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. हा नाका उभारताना ग्रामपंचायतीची परवानगीही घेण्यात आलेली नाही.