आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Where Was Azad Hind Sena's Crores Of Rupees? Subhashchandra Grand Dughter Question

आझाद हिंद सेनेचे कोट्यवधी रुपये गेले कुठे?, सुभाषचंद्र बोस यांच्या पणती रेणुका यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या जबरदस्त प्रयोगामुळे आम्हाला
भारत सोडावा लागला, असे जर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान अॅटली म्हणत असतील तर अशा या क्रांतिवीराची जीवनगाथा देशाला का कळू दिली जात नाही? एवढेच नव्हे, तर आझाद हिंद सेनेचे कोट्यवधी रुपये गेले कुठे?’ असे प्रश्न नेताजी बोस यांच्या पणती रेणुका चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना उपस्थित केले आहेत.
काेल्हापूरपासून जवळच सुरू असलेल्या संस्कृती महोत्सवामध्ये ‘ग्रामीण विकास’ या
विषयाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्या कोलकात्याहून आल्या होत्या. २३ जानेवारी
रोजी नेताजी बोस यांची जयंती. यानिमित्ताने त्यांना बोलते केल्यानंतर चौधरी यांनी
आपल्या मनातील भावना ‘दिव्य मराठी’जवळ बोलून दाखवल्या.

‘सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणा-या अनेक फाइल्स केंद्र सरकारकडे बंदिस्त आहेत. त्या एकट्या सुभाषबाबूंच्या म्हणून महत्त्वाच्या नाहीत, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जगभरातून मदत निर्माण करून बाहेरून ब्रिटिशांवर हल्ला करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा बाळगणा-या प्रचंड ताकदीच्या महानेत्याची आहे. लोकशाही देशामध्ये अशा क्रांतिकारकाची माहिती जनतेला मिळू नये हे दुर्दैव नाही का?’ अशी विचारणाही चौधरी यांनी केली.
नवा इतिहास उलगडेल
नेताजींनी प्रतिसरकार स्थापन केले होते. परकीय धोरणापासून ते शेती धोरणापर्यंतची आखणी त्यांनी केली होती. या प्रतिसरकारचे आणि आझाद हिंद सेनेचे कोट्यवधी रुपये शिल्लक होते. हे पैसे कुठे गेले याचाही पत्ता लागलेला नाही, असा पुनरुच्चारही चाैधरी यांनी केला. पंडित नेहरूंनी अनेक ठिकाणी समझोते केले. लॉर्ड माउंटबॅटन आणि अशा अनेक व्यक्तिमत्त्वांशी नेहरू यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी हे समझोते केले. मात्र, नेताजींच्या संबंधातील या फाइल्स जर खुल्या झाल्या तर एक नवा इतिहास युवा पिढीसमोर येईल. मोदी सरकारकडून याबाबत अपेक्षा बाळगून असल्याचेही त्या म्हणाल्या.
माहिती उघड व्हायलाच हवी
सुभाषबाबूंच्या संबंधित फाइल्स जर उघड केल्या तर देशविदेशात अनेक मुद्द्यांवर गोंधळ
होईल, अशी भीती त्या त्या वेळी व्यक्त करण्यात आली आहे; परंतु जर नेताजींनी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित केले असेल तर त्यांच्या कार्याविषयी आणि
मृत्यूविषयीही माहिती बाहेर आली पाहिजे, अशी अपेक्षाही चौधरी यांनी व्यक्त केली.

चौधरी यांचे कार्य
रेणुका चौधरी या सुभाषबाबूंच्या भगिनी स्नेहलता बोस यांच्या पणती.इन्स्टिट्यूट ऑफ
इंटरनॅशनल सोशल डेव्हलपमेंट या न्यूयॉर्क, पॅरिस येथे शाखा असलेल्या स्वयंसेवी
संस्थेच्या माध्यमातून त्या कोलकाता येथे कार्यरत.