आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Now Get Entry In Kolhapur Mahalaxmi Mandir

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर गाभा-यात महिलांनी केली पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- शनि शिंगणापूरनंतर आता कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात आता महिलांना प्रवेश मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत स्त्री-पुरुष समता समिती व महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्या वतीने सोमवारी सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी मंदिर गाभा-यात प्रवेश करून दहा महिलांनी दर्शन घेतले. महालक्ष्मीची खणा-नारळाने ओटी भरून पूजा करत गाभा-यातच ‘स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. हायकोर्टच्या निर्णयाचा मान राखत श्रीपूजकांनीही गाभा-यात महिलांना प्रवेश देण्याबाबत कोणताही विरोध केला नाही.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महालक्ष्मी मंदिर गाभा-यात 13 एप्रिलला प्रवेश करणारच, असा इशारा दिला होता. बाहरेच्या महिलांनी येऊन महालक्ष्मी मंदिर गाभार्‍यात जाण्याचा इशारा देऊन शहरातील वातावरण गढूळ करू नये, यासाठी सर्वपक्षीय संघटना व पुरोगामी संघटनेच्या महिलांनी बैठक घेतली. या बैठकीत पाच महिलांना मंदिर गाभार्‍यात पाठवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात बैठक घेण्यात आली. महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देणार नाही, कोणत्याही कारवाईला न घाबरता आम्ही विरोध करू, अशी भूमिका पुजा-यांनी मांडली.
मात्र, महिलांनी हे जुमानता मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. काही महिलांनी हातात खण, नारळाची ओटी घेऊन पितळी महालक्ष्मी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश केला. दहापैकी सात महिलांना गाभार्‍यात प्रवेश दिला गेला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अन्य भाविकांना देवीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला होता. श्रीपूजकांनी खणा-नारळाची ओटी घेऊन आंदोलक महिलांना प्रसाद दिला. यावेळी आंदोलक महिलांनी ‘स्त्री-पुरुष समता समितीचा विजय असो’, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यानंतर पोलिस बंदोबस्तातच या महिलांना मंदिराच्या बाहेर नेण्यात आले.