आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली- ज्यांच्या विचारांचा वारसा सांगून मतांचा जोगवा मागितला जातो, त्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराच्या स्मारकाकडे लक्ष द्यायला मात्र सरकारकडे वेळ नाही. पुरातत्त्व खात्याने ही जबाबदारी घेतली खरी; पण देखभालीसाठी एकाही कर्मचार्याची नेमणूक न केल्याने शाळकरी मुलांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे.
सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे हे यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव. त्यांचा जन्म झालेल्या घराची देखभाल शेजारीच राहणारे आगा नावाचे कुटुंब मोठ्या आदराने करत होते. मात्र, गावातील रस्ता रुंदीकरणात त्यांचेच घर गेले. त्यामुळे आगा दुसरीकडे राहायला गेल्याने यशवंतरावांच्या जन्मघराची देखभाल बंद झाली. देखभालीसाठी खर्च पुरातत्त्व खात्याने उचलला आणि या कामासाठी कर्मचारी नेमला; मात्र हे सारे कागदोपत्रीच झाले. देखभालीचा ना खर्च आला, ना कर्मचारी. त्यामुळे स्मारकाची पुन्हा हेळसांड सुरू झाली.
गावातील यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनीचे संस्थापक दत्तात्रय सपकाळ यांनी यशवंतराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्मारकाच्या देखभालीसाठी निधी व वेळ देण्याचे आवाहन केले. शाळेचे शिक्षक प्रमोद मोरे यांनी पुढाकार घेऊन कृतज्ञता निधी समिती स्थापन केली. मुलांनीही मोठ्या आनंदाने त्याला प्रतिसाद देत महिन्याकाठी प्रत्येकी एक तर कर्मचार्यांनी प्रत्येकी दहा रुपयांचा निधी समितीकडे जमा केला. सध्या दररोज यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणे, सायंकाळी घरात निरंजन लावणे, महिन्यातून एकदा शेणसडा घालून जमीन सारवणे, ही कामे नित्याने सुरू झाली. आठवड्यातून दोनदा शाळेतील एका वर्गाचे विद्यार्थी घराची साफसफाई करून रांगोळी काढतात. घराचे वीज बिलही मुलांकडून जमा होणार्या कृतज्ञता निधीतून भागवले जाते.
स्मारक निधी कुठे आहे?
गेल्या वर्षी यशवंतरावांच्या जन्मशताब्दीला राज्य शासनाने गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यातून गावातील रस्ते झाले. यशवंतरावांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी 2 कोटी 27 लाख रुपये शासनाने मंजूर केले; मात्र त्यातील एक रुपयाही अद्याप मिळाला नाही.
चव्हाण प्रतिष्ठानकडून स्मारक दत्तक
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने मध्यंतरी महाराष्ट्रातील काही स्मारके देखभालीसाठी दत्तक घेतली. त्यात देवराष्ट्रेतील यशवंतरावांच्या या स्मारकाचा समावेश आहे; मात्र प्रतिष्ठानकडून यशवंतराव चव्हाणांच्या या स्मारकाच्या देखभालीसाठी पुढे काहीच प्रयत्न करण्यात आले नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.