आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Walks On Dr. Narendra Dabholkar's Transforming Path

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दाखवलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर जाण्‍यास तरूणाईचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दाखविलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर जाण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, या कार्यापासून तसूभरही मागे हटणार नाही’ असा निर्धार गुरुवारी साता-यातील तरुणाईने डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत व्यक्त केला. या वेळी डॉ.हमीद यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.


दहा दिवस उलटले तरी डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी व सूत्रधारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्याच्या निषेधार्थ पुरोगामी संघटना व महाविद्यालयीन तरुणाईने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढला. राजवाड्यापासून निघालेल्या या मोर्चात तोंडाला काळी पट्टी लावून व दाभोलकरांची छायाचित्रे असलेले फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद, अंनिसचे उदय चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांचाही समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. डॉ. हमीद म्हणाले की, डॉक्टरांचा विवेकवादाचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. पर्यावरणपूरक दिवाळी, गणपती या संकल्पना प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत. त्यांचे काम मोठे होते, पण तुमचे पाठबळही काही छोटे नाही. आपण डॉक्टरांच्या संकल्पना सत्यात उतरवूया, असे आवाहन करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. अनेक विद्यार्थ्यांनाही अश्रू अनावर झाले. विजय मांडके यांनी डॉ. हमीद यांना सावरत निर्धार शपथ वाचून दाखवली.


‘यापुढे तरी हल्ले होऊ नयेत’
डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक व्हावी, केवळ मारेकरीच नव्हे तर सूत्रधारही शोधून काढावा. यापुढे तरी पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर असे हल्ले होणार नाहीत याची काळजी शासनाने घ्यावी, तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सर्वांनी केली.