आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी सरकारविराेधात काळा दिन, बेळगावी युवाशक्ती उतरली रस्त्यावर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - बेळगावसह कर्नाटकातील सीमा भागात १ नोव्हेंबर हा काळा दिन पाळण्यासाठी रविवारी मराठी भाषिक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यात युवकांची संख्या लक्षणीय होती. सर्व गटतट विसरून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने झालेल्या बैठकीला शिवसेनेचे जालन्यातील आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी साडेनऊ ते दुपारी १ या कालावधीत ही सायकर रॅली बेळगाव शहरभर फिरली. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेच्या घोषणांनी बेळगाव दणाणून गेले. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकवार कर्नाटक पोलिसांनी दंडेलशाही सुरू केल्याने त्याचा वचपा काढत युवकांनी चार तास घोषणाबाजी सुरू ठेवली होती. या रॅलीमध्ये शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर, उपाध्यक्ष टी. के. पाटील, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर, शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे यांच्यासह विविध संघटना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काळे झेंडे, काळा वेश घातलेल्या अनेकांना पोलिसांनी ठिकठिकाणी अडवण्याचाही प्रयत्न केला.
रॅलीनंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचे इथल्या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचे सांगितले. या वेळी आमदार संभाजी पाटील, मनोहर किणेकर, दीपक दळवी यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते.