सांगली - माझ्या दारातले झाड, उंच वाढले ताड
त्याला घालुनिया पाणी, रोज करीन मी लाड
कोल्हापूर जिल्ह्यातील रमिजा जमादारने सादर केलेली ही कविता. सांगलीत शुक्रवारी आगळे साहित्य संमेलन पार पडले. सूत्रसंचालनापासून संमेलनाध्यक्ष, कवी संमेलनाध्यक्ष आदी सबकुछ मुलेच, असे त्याचे स्वरूप होते. यात मुलांनी कविता-कथांतून उलगडलेल्या आपल्या भावविश्वामुळे उपस्थित साहित्यिकही भारावले.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग मिरज पंचायत समिती व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने साकारला. यासाठी मिरजेचे गटशिक्षण अधिकारी नामदेव माळी यांनी पुढाकार घेतला. तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडची बालकवी रमिजा जमादार ही संमेलनाध्यक्ष होती.
उलगडले भावविश्व : मुलांनी कविता-कथांतून आपली निसर्ग, सभोवतालचे पर्यावरण, नातीगोती यांच्याविषयी असलेली जाण व्यक्त केली. साहित्यमूल्यांची असलेली त्यांची समजही सर्वांनी अनुभवली. संमेलनाचा सर्व खर्च जि.प.च्या 13 शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून केला.
मुलांना दोन वर्षे प्रेरणा, मगच सादरीकरण
ग्रामीण भागातील मुलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना स्वत: साहित्यिक असलेले माळी व सदानंद कदम आणि अन्य शिक्षकांच्या मनात आली. मुलांना दोन वर्षे कथा-कविता लिहिण्याची प्रेरणा देऊन सादरीकरणायोग्य साहित्यनिर्मिती झाल्यानंतर त्यांनी संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला. या मुलांची प्रतिभा त्यांच्या पुस्तकातील लेखकांपर्यंत पोहोचावी म्हणून कवी विठ्ठल वाघ आणि कथाकार गोविंद गोडबोले यांना मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले.