आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनातील भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात टाका, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला ‘घरचा आहेर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘राज्यातील सिंचनाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर धरणे पूर्ण झाली असती. शेतकरी, सर्वसामान्यांवर पाण्यासाठी अशी रानोमाळ भटकण्याची वेळ आली नसती. या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना तुरुंगातच टाकले पाहिजे , त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले पाहिजेत. यांचे चारित्र्य खराेखरच धुतल्या तांदळासारखे असेल तर अशा नेत्यांनी पोलिस संरक्षण काढून रस्त्यावर फिरुन दाखवावे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भाेसले यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर पुन्हा एकदा ‘हल्ला’ चढवला. ‘कारवाईत भुजबळांचा नंबर आधी का लागला, याची उत्तर मी देऊ शकत नाही. कारण मी मटका खेळत नाही,’ असा टाेलाही त्यांनी लगावला.

जल जागृती सप्ताहाचे आैचित्य साधून सातारा जिल्ह्यातील दुष्काळीची माहिती देण्यासाठी रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ‘जल जागृती सप्ताहात पाणी बचतीची प्रतिज्ञा देण्यात येते. त्यात दोन ओळी वाढवल्या पाहिजेत, त्या म्हणजे ‘ज्यांनी ज्यांनी सिंचनात भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत. ‘भ्रष्टाचार करुन ज्यांनी धरणे आणि पाणलोट केले भकास, स्वत:ची घरे केली झकास, सामाजिक परिस्थिती केली उदास त्यांना जनताच लावेल धसास ’या ओळी या प्रतिज्ञेत समाविष्ट कराव्यात, अशी उपहासात्मक मागणीही खासदार भाेसलेंनी केली.

‘कुठला पक्ष आणि कुठलं काय?माझा लढा पक्षविरहित आहे. या लढ्यात मी कोणाला भिक घालत नाही. मी भ्रष्टाचारा विरोधात लढतो आहे. भ्रष्टाचारी लाेक तुरूंगात गेले पाहिजेत, नाही तर जनतेतूनच उठाव हाेईल. जी मंडळी भ्रष्टाचारी आहेत त्यांना घेराव घातला पाहिजे. राजीनामा द्यायला लावला पाहिजे. घरी पाठवले पाहिजे. अशा नेत्यांना शासन व्हायलाच पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचार केले पैसे वसूल केले पाहिजेत, कारण ते पैसे जनतेचे आहेत. राज्यातील धरणांची कामे वेळेत पूर्ण न केल्याने दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही. यामूळे आज शेतकरी आणि सामान्यांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे. नेत्यांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात ते पैसे दुष्काळी भागातील जनतेच्या हितासाठी द्यावेत,’ अशी मागणी करत उदयनराजेंनी सर्व पक्षीय नेत्यांना टाेले लगावले.

भारताचा जयजयकार करण्यास लाज वाटते?
‘भारत माता की जय’ ही काही शिवी नाही. आपल्या देशाचा जयजयकार करायला लाज का वाटावी? देशप्रेमामुळेच आपला देश अखंड आहे. जर देशप्रेम ढासळले तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकांमध्ये वितुष्ट येईल असे राजकारण करू नये,’ असा टाेला उदयनराजेंनी आवेंसींची नाव न घेता लगावला. जनतेचा अंकुश लोकप्रतिनिधींवर असेल तरच विकास होईल व लोकशाही टिकेल अन्यथा ती संपुष्टात येईल, अशी भीतीही त्यांनी बाेलून दाखवली.
पुढील स्लाईडवर वाचा.... पठाण यांच्या निलंबन प्रस्तावास साथ ही कॉँग्रेसची घोडचूक असल्याचे दलवाई यांनी सांगितले आहे.... मुस्लिमांनी हिंदूंवर विश्वास ठेवावा, असेही ते म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...