सोलापूर- यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) लागू करण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय श्रममंत्री बंंडारू दत्तात्रय यांनी रविवारी हस्तक्षेप केला. त्यांचे सचिव रमणा यांनी येथील विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांना संपर्क साधून, पुढील आदेश येईपर्यंत कुठलीच कारवाई करू नका, अशी सूचना केली. त्यावर तिरपुडे म्हणाले, ‘ठीक आहे. तसा लेखी आदेश द्या.’ सोमवारी आदेश मिळेल, असे उत्तर मिळाल्याने हा विषय तात्पुरता बाजूला राहिला.
दुसरीकडे श्री. दत्तात्रय यांनी, तातडीने कारखाने सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता यंत्रमागधारक संघात सर्व कारखानदारांची बैठक होईल. तीत दत्तात्रय यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यात येईल. त्यानंतर ‘बंद’मागे घेण्याची शक्यता आहे. मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. २३) मुंबईत बैठक आयोजित केली असून, तीत तोडगा काढण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. तिरपुडे यांच्यासह भविष्य निधीचे आयुक्त राय, खासदार किरीट सोमय्या यांनाही बाेलावण्याची सूचना केली.
यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हैदराबादच्या भाजप कार्यालयात दुपारी श्री. दत्तात्रय यांची भेट घेतली. २० मिनिटांच्या या चर्चेत श्री. दत्तात्रय यांनी, सोलापूरच्या या प्रश्नाविषयी खासदार बनसोडे यांनी सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले. हा विषय जादा ताणू नका. कामगार आणि उद्योजक एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांनीही चर्चेतूनच तोडगा काढला पाहिजे. थेट बंद ठेवून त्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असेही म्हणाले. भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या मध्यस्थीने श्री. दत्तात्रय यांची भेट घडून आली. या वेळी यंत्रमागधारक संघाचे प्रेसिडेंट धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम, मल्लिकार्जुन अरकाल, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, श्रीनिवास दायमा आदी होते.
मला फोन आला, मी लेखीच मागितले!
मंत्रिमहोदयदत्तात्रययांच्या सचिवांनी रविवारी माझ्याशी संपर्क साधला. पुढील सूचना येईपर्यंत यंत्रमागधारकांवर कुठलीच कारवाई करू नये, अशी सूचना केली. परंतु मी लेखी आदेश मागितला. सोमवारी लेखी पाठवणार असल्याचे ते म्हणाले.
- डॉ.हेमंत तिरपुडे, विभागीय आयुक्त (भविष्य निधी)
मी कामगारांना घेऊन पंतप्रधानांकडे जाणार
झालेल्यानिर्णयावरकेंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप होणे ही बाब धक्कादायक आहे. श्रममंत्री म्हणून ते कामगारांच्या बाजूनेच उभे राहणे उचित ठरले असते. या घडामोडी घडल्या तरी सोमवारचा आक्रोश मार्चा निघणारच. शेवटी कामगारांना घेऊन पंतप्रधानांकडे जाईन.
- नरसय्या आडम, ‘सीटू’चे राज्य अध्यक्ष