आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- शिवसन्मान जागर परिषदेत रविवारी रात्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरज दंगलीचे सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे हेच असल्याचा आरोप अाव्हाड यांनी केल्यानंतर सोमवारी सांगली जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घ्यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, पुरोगामी विचार मंचने काल रविवारी शिवसन्मान जागर परिषदेचे अायाेजन केले हाेते. या परिषदेत आमदार आव्हाड यांनी मिरज दंगलीचे सूत्रधार संभाजीराव भिडे हेच असल्याचा आरोप केल्याने शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन आव्हाड यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली.
अॅड. के. डी. शिंदे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित आव्हाड यांच्यावर एकाने पिस्तूल रोखल्याची तक्रार केली आहे. तर शिव प्रतिष्ठानच्या तक्रारीनुसार, आव्हाड यांच्यासह के. डी. शिंदे, डॉ.संजय पाटील, नितीन चव्हाण, बाळासाहेब पाटील, श्रीरंग पाटील, सुयोग औंधकर, अभियंता देसाई यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अाव्हाडांवर कारवाई करा : भाजप
संभाजीराव भिडे आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि जागर परिषदेच्या संयोजकांनी अवमानकारक वक्तव्ये करून सांगलीकरांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, असे भाजपच्या निवेदनात म्हटले आहे.