आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मसुचीवाडीत अखेर दक्षता समिती स्थापन, ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्याला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - शेजारील बाेरगावच्या गावगुंडांना रोखण्यासाठी मसुचीवाडी येथे महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. महिला पोलिस, महाविद्यालयीन तरुणी, ग्रामपंचायत सदस्या आणि गावातील काही महिलांचा या समितीत समावेश आहे.

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींना त्रास देणाऱ्या गावगुंडांना कंटाळून अापल्या गावातील मुलींना शिक्षणासाठी अन्य गावांत पाठवण्याचा निर्णय मसुचीवाडीच्या ग्रामस्थांनी घेतला हाेता. ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर स्थानिक पाेलिसांबराेबरच राज्य महिला अायाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनीही त्याची दखल घेतली हाेती. रहाटकरांनी तर थेट गावाला भेट देऊन उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मात्र, दाेन महिने उलटले तरी अद्याप याबाबत काहीच उपाययाेजना झाल्या नसून बाेरगावात गावगुंडांची दहशत कायमच असल्याकडे नुकतेच ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले हाेते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मंगळवारी गावकऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सरपंच सुहास कदम यांनी सुचवल्याप्रमाणे दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इस्लामपूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत एक महिला कॉन्स्टेबल, गावातील चार महाविद्यालयीन तरुणी आणि १३ महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तरुणींच्या तक्रारी, सूचना यांचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल. छेडछाडीच्या घटना घडल्यास तत्काळ समितीला कळवून त्यामार्फत पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

तक्रारी कळवा
‘मसुचीवाडी येथे दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मुलींच्या तक्रारींची दखल घेईल. तरुणींच्या छेडछाडीबाबतच्या काही तक्रारी असल्यास दक्षता कमिटीला कळवाव्यात. त्यानुसार कारवाई केली जाईल.’
प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, इस्लामपूर पोलिस ठाणे.
....तर स्वतंत्र बसही सुरू करण्याची तयारी
मसुचीवाडी येथील मुलींना इस्लामपूर येथे शिक्षणासाठी येण्यासाठी बस सुरू करू, असे आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले होते. त्याबाबतचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले; मात्र ‘अामच्याकडे असे आदेश आलेले नाहीत. मात्र आम्ही आदेशांची वाट न पाहता उपाययाेजना करायला तयार अाहाेत. गावातून एका बसमधून किमान ५० मुली शिक्षणासाठी जाणार असतील तर खास मुलींसाठी बस सुरू करण्याची तयारी आहे. त्यासाठी आम्ही मसुचीवाडीतील मुलींच्या पासची संख्या तपासत आहोत.
प्रदीप कांबळे, इस्लामपूर आगार व्यवस्थापक
बातम्या आणखी आहेत...