आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawde Said There Should Be No Controversies In Sahitya Sammelan

संमेलनाबाबत वाद नकोत; भाषा संवर्धनावर चर्चा हवी, विनाेद तावडे यांची अपेक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘मराठी साहित्य संमेलनाबाबत आता कोणतेही वाद नकोत. आता केवळ साहित्य आणि भाषा संवर्धनावरच चर्चा व्हावी’, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. आतापर्यंतचे सर्व वाद बाजूला ठेवून पिंपरीतील संमेलनाच्या उद‌्घाटनाला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर समारोपाला रविवारी मी जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीतील शासकीय रुग्णालयाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन, जिल्हा क्रीडा संकुलातील इमारतीच्या उद््घाटनानिमित्त तावडे शहरात अाले हाेते. पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, ‘साहित्य संमेलन हा मराठी साहित्य रसिकांचा मेळा असतो. साहित्य संवर्धनासाठी शासन नेहमीच पुढे राहिले आहे. म्हणून यावर्षी संमेलनाच्या अनुदानाची रक्कम दसऱ्यापूर्वीच साहित्य महामंडळाकडे वर्ग केली आहे. संमेलनाबाबत आजवर जे काही वाद झाले, ते बाजूला ठेवून मुख्यमंत्री उद‌्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मी स्वत: समारोपाला उपस्थित राहणार आहे. आता केवळ साहित्य आणि भाषा यावरच चर्चा होईल, ही अपेक्षा आहे.’

मराठी पुस्तकांची जबाबदारी सरकारची
‘दुकान भाडे परवडत नसल्याची पुस्तक विक्रेत्यांची तक्रार लक्षात घेऊन शासन पुस्तक विक्रेत्यांना अल्प दरात महापालिका, नगरपालिकांचे गाळे उपलब्ध करून देईल. मराठी वाचकांना पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची राहील,’ अशी ग्वाहीही तावडेंनी दिली. शासकीय रुग्णालयांच्या मोकळ्या जागा पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिपमधून मध्य प्रदेशप्रमाणे विकसित करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळा निवडीचे पालकांना स्वातंत्र्य
‘राज्यात प्राथमिक शिक्षणात प्रत्येक मुलावर शासन दरवर्षी ९६ हजार रुपये खर्च करते. तरीही त्याचा योग्य परतावा मिळत नाही. मुलांच्या शिक्षणावर शासनाकडून खर्च होत असलेल्या रकमेचे व्हाऊचर देऊन त्यांना शाळा निवडीचे स्वातंत्र्य देण्याचा प्रयोग विचाराधीन आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात असा प्रयोग राबवला गेला आहे. शिक्षण संस्था, शिक्षक संघटना आणि पालकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल,’ असेही तावडेंनी स्पष्ट केले.