आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या नावे 10 हजारांची ठेव, सोलापूरमधील होटगी स्टेशन गावचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - गावातील मुलींचा जन्मदर वाढावा, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाविषयी ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी, यासाठी ज्यांना पहिली दुसरी मुलगी होईल त्या मुलींच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा एक आदर्श निर्णय होटगी स्टेशन ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसा ठराव सरपंच कांचन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ३० नोव्हेंबरच्या मासिक बैठकीत करण्यात आला. 

 

केंद्र राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढावा, वंशाला दिवा हवा या विकृत प्रवृत्तीने तिचा जन्माअगोदर बळी जावू नये. यासाठी जनजागृती करण्याबरोबर अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे. याचा चांगला फायदा समाजात होताना दिसतोय. अनेक सामाजिक संस्था, संघटना मुलींच्या जन्माचे महत्त्व सांगताना विविध उपक्रमातून जनजागृती बरोबर पाठबळ देत आहेत. एखाद्याला मुलगी होताच घरात लक्ष्मी आली ही भावना आईवडिलांसह कुटुंबात निर्माण होत आहे. असाच एक चांगला आदर्शवत निर्णय घेतला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन गावच्या ग्रामपंचायतीने. 


तीन हजार लोकसंख्येच्या या गावातून दक्षिणेकडे रेल्वे जातात. त्यामुळे होटगी स्टेशन गावाला वेगळी ओळख आहे. त्यातच एनटीपीसीचा प्रकल्प झाल्याने गावचा आर्थिकस्तर उंचावला आहे. या छोट्याशा ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढले. सर्वधर्म समभावाने येथील ग्रामस्थ एकत्र येतात. गेल्या ३० नोव्हेंबरला ग्रामपंचायतीची मासिक बैठक होती. सरपंच कांचन गायकवाड यांच्यासह सर्व सदस्य मंडळी गावाच्या विकासाची चर्चा करू लागले. त्यावेळी मुलींच्या जन्मासाठी काहीतरी चांगला उपक्रम सुरू करण्याचा विचार पुढे आला. तेव्हा मुलींच्या जन्मासाठी सरकार योजना आहेत. मग आपणही याला प्रोत्साहन देऊ असा निर्णय झाला. गावातील ज्या दांपत्याला पहिली दुसरी मुलगी होईल तिच्या आईच्या संयुक्त नावे प्रत्येकी १० हजार रुपये ठेव ठेवण्याचे ठरले. तसेच जे दांपत्य एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करेल त्यांच्या नावेही २१ हजार रुपये ठेव ठेवली जाईल. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिली जाणार आहे. या बैठकीला सरपंच गायकवाड यांच्यासह उपसरपंच बापू कोकरे, सुभाष पाटोळे, निसार कांबळे, हमीद बागवान, सुभाष लोखंडे, दीपाली गायकवाड, चिमा वावरे, प्रभावती बंडगर, लियाकतबानो कांबळे, कमलाबाई वाघमोडे ग्रामसेवक संजय आदमिले उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या चांगल्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. 

 

मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी 
मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते. गावातील मुलींची संख्या वाढावी. मुली आता सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. तेव्हा मुलींसाठी काहीतरी करावे या भावनेतून दहा हजाराची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला. 
- कांचन गायकवाड, सरपंच, होटगी स्टेशन 

बातम्या आणखी आहेत...