आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच दिवशी दोघा तरुण मुलांना खांदा देण्याची वेळ वृद्ध पित्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकाच दिवशी दोन अंत्ययात्रेत दोघा तरुण मुलांना खांदा देण्याची वेळ वृद्ध पित्यावर आली. तर वृद्ध आईला हे कठीण वास्तव पचवणे अवघड झाले. एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दोघे सहा दिवसांपासून इस्पितळात मृत्यूशी झुंज देत होते. सैफन फकरोद्दीन मुंडासघर (वय ३२) आणि इब्राहिम फकरोद्दीन मुंडासघर (वय २८, रा. शिवगंगानगर भाग तीन) अशी त्यांची नावे आहेत. 
 
वाहनांना पॉलिश करण्याचे स्प्रे ते दोघे फिरून विकत होते. जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीने परतताना समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या खासगी प्रवासी क्रुझर जीपने (केए २८, एन ५१४०) जोराची धडक दिली. त्यात दोघांच्या डोक्याला जबर इजा झाली. हात-पायाचे हाड मोडले होते. जीपचालक पळून गेला. सहा दिवस झाले तरी पोलिसांना त्याचा मागमूस लागलेला नाही. 

दोघांना इलाजासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पहिला मुलगा सैफन यांना डोक्याला गंभीर जखम असल्याने विशेष इलाजासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये हलवले होते. त्यांचा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी झाला. ते उरकून आल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास दुसरा मुलगा इब्राहिम यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. एकाच दिवशी दोन्ही मुलांना निरोप देण्याची वेळ वृद्ध माता-पित्यावर आली. दुसऱ्या मुलाचेही निधन झाल्याचे त्यांना सांगण्यास कोणीही धजावत नव्हते. मात्र, सांगणे भाग होते. ही माहिती कळताच आई भोवळ येऊन खाली कोसळली. 

जीपचालकास अद्याप अटक नाही : भीषणअपघातास सहा दिवस उलटले तरी संशयित जीपचालकास अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सात रस्ता परिसरातील पेट्रोल पंपाजवळ कर्नाटक हद्दीत जाणारी अनेक खासगी प्रवासी वाहने ये-जा करत असतात. या मार्गावर सात रस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, सोरेगाव कॅम्प आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कामावर असतातच. तरीही जीपचालकाचा शोध लागलेला नाही. दुसरीकडे मार्केट यार्ड परिसरातील अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली होती. मात्र, मुंडासघर कुटुंबीयांचा त्यांना विसर पडला. मतदारसंघातील नागरिक असूनही सहकारमंत्री सुभाष देशमुख या घटनेत उदासीन राहिले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

घरातले दोघे कर्ते गेले 
मुंडास घर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. चार भावंडे, एक बहीण, आई-वडील असे कुटुंब. बहिणीचे लग्न झालेले. एक भाऊ महेमूद गतिमंद आहे. लहान भाऊ वहाब यास कर्ज काढून आखाती देशात कामासाठी पाठवले. इब्राहिम सैफन यांच्यावरच कुटुंबाची मदार होती. सैफन यांच्यामागे पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे. इब्राहिम यांच्या मागे पत्नी आहे.