आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर विभागाकडून २१५ गाड्या धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. सोलापूर एसटी विभागाच्या २१५ एसटी गाड्या गणेशोत्सवाच्या प्रारंभी धावणार आहेत. १०० गाड्या या सोलापूरला येण्यासाठी धावतील. उर्वरित ११५ गाड्या मुंबईहून कोकणात धावणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या घरी जाणे सोईचे हाेणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बाहेर गावच्या मंडळींना सोलापूर गाठता यावे म्हणून १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यापैकी सर्वाधिक गाड्या पुणेहून सोलापूरला येतील. पुण्यात गेलेल्या सोलापूरकरांची संख्या अधिक असल्याने पुण्याहून जास्तीच्या गाड्या सोडण्यात येतील. तसेच, मुंबईहून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक अाहे. त्यामुळे राज्यभरातून विविध विभागाच्या गाड्या मुंबईत दाखल होतात.

सोलापूर विभागाच्याही गाड्या मुंबईला जाणार आहेत. सुमारे ११५ गाड्या या मुंबईवरून कोकणात जातील. मुंबई-रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, कणकवली, वेंगुर्ला, चिपळूण, गुहागर आदी भागात सोलापूर विभागाच्या एसटी धावतील. गाड्या मुंबई - कोकण अशा धावतील. त्यानंतर गाड्या पुन्हा सोलापूरला येणार आहेत.
पूर्वभाग मध्यवर्ती मंडळाची बैठक; परवाना अर्ज भरून देण्याचे आवाहन
पूर्वभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची बैठक बुधवारी सायंकाळी मद्दा मंगल कार्यालयात झाली. यावेळी नगरसेवक पांडुरंग दिड्डी म्हणाले, ‘‘या मध्यवर्ती मंडळ अंतर्गतच्या मंडळांचे पोलिस आयुक्तालयाकडून िमळणारे परवाने एकत्रित घेणार असल्याने अर्ज कार्यालयात द्यावेत.” धर्मदाय आयुक्तांकडे प्रत्येक मंडळांची नोंदणी सक्तीचे आहे. तात्पुरत्या स्वरूपात आम्ही घेणार असल्याची माहिती विष्णू कारमपुरी यांनी दिली. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे मंडप उभारावा. रस्त्यावर अडथळा आणि ध्वनिप्रदूषण होईल असे मंडप डॉल्बी लावू नये, असे जेल रोडचे पोलिस निरीक्षक फारूक काझी यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष लक्ष्मीकांत गड्डम, उमेश मामड्याल, सूर्यकांत जिद्दम, विक्रम पिस्के, नागेश सरगम यांच्यासह दोनशे जण उपस्थित होते.

कुंभमेळ्यासाठी ५० गाड्या
नाशिक येथील कुंभमेळाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर सोलापूर विभागाचे सुमारे ५० गाड्या सोलापूरहून नाशिकला जाणार आहेत. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान नाशिक येथे पर्वणी असल्याने मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक नाशिकला दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पर्वणी काळात सोलापूर विभागाच्या सुमारे ५० एसटी गाड्या नाशिकला जातील.त्यानंतर याच गाड्या कोकणात जाण्यासाठी नाशिकहून मुंबईला रवाना होतील.

^गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर एसटी विभागाने चांगले नियोजन केले आहे. भक्तांना घरी जाण्यासाठी मुबलक प्रमाणात एसटीची सोय करण्यात आली आहे. गरजेनुसार यात वाढ होऊ शकते. श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, सोलापूर